हायमास्ट लॅम्पच्या खांबावर शेतमजूराने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 18:10 IST2019-11-21T18:10:15+5:302019-11-21T18:10:27+5:30
नैराश्य: खानापूर येथील घटना

हायमास्ट लॅम्पच्या खांबावर शेतमजूराने घेतला गळफास
रावेर : तालूक्यातील खानापूर येथील शेतमजुर कैलास देवराम पाटील (वय ४७) यांनी हाताला काम नसल्याने कानिफनाथ महाराज देवस्थान मंदिरासमोरील हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोरी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची केली. गुरूवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
खानापूर येथील कैलास पाटील हे त्यांची पत्नी व मुलासह शेतमजूरीने संसाराचा गाडा ओढत होते. अवकाळी पावसाने तिघांच्याही हाताला गत पंधरा दिवसात काम नव्हते. आज कमवाल तर उद्या भाकरी दिसेल अशी कुटुंबाची परिस्थिती असल्यामुळे ते अस्वस्थ होते. यातूनच त्यांनी आपली जिवनयात्रा संपविली.
याप्रकरणी विकास मोतीराम पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन.डी. महाजन व डॉ. स्वप्निशा पाटील यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.