जळगाव : सोशल मीडियावर २१ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करुन त्याद्वारे तिच्या मोबाईलवर अनोळखी लोकांना फोन व मेसेज करायला लावून बदनामी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अजय पाटील (रा. नंदूरबार) या तरुणाला सायबर पोलिसांनी नंदूरबार येथून अटक केली आहे. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी जळगावात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शहरातील २१ वर्षीय तरुणीच्या नावाने वेबसाईटवर तिचा मोबाईल क्रमांक नमूद करून बनावट प्रोफाईल तयार करण्यात आली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करुन ही प्रोफाईल तरुणीचीच असल्याचे भासविण्यात आले होते. त्यामुळे या तरुणीला अनोळखी लोकांचे फोन कॉल व मेसेज येऊ लागले होते. या प्रकाराने त्रस्त झालेल्या तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
तांत्रिक विश्लेषणाने संशयित निष्पन्न
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तब्बल आठ दिवस याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर हा गुन्हा नंदूरबार येथील अजय पाटील याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उपनिरीक्षक अंगद नेमाणे, राजेंद्र पाटील, प्रशांत साळी, संदीप नन्नवरे, सचिन सोनवणे, मिलिंद जाधव व अरविंद वानखेडे यांनी गुन्हा उघड करून संशयिताला अटक केली.