जळगाव : कांदा पीक कमी कालवधीत उत्पादन देणारे पीक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीधर देसले यांनी केले.
खर्ची, ता. एरंडोल येथे तालुकास्तरीय कौशल्य विकास व आत्मा योजनेअंतर्गत निर्यातक्षम कांदा लागवड प्रशिक्षण वर्ग पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, उत्तम माळी, प्रगतशील शेतकरी अजित पाटील उपस्थितीत होते. या प्रशिक्षण वर्गामध्ये आत्मा गटाचे सदस्य तसेच खर्ची, रवंजे, खडके येथील १०५ कांदा उत्पादक उपस्थित होते. यावेळी अनावश्यक औषधांच्या फवारणीमुळे वाढलेला खर्च कसा कमी करावा, कीड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करता यावे, यासह निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानासह मार्गदर्शन केले. डॉ. देसले यांनी बीज प्रक्रियेपासून ते रोप लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. जैविक खतांचा वापर करून कमी खर्चात पोषक आणि निरोगी पीक कसे घेता येईल, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कांदा उत्पादनासाठी परागीभवन ही प्रक्रिया महत्त्वाची असून त्यासाठी मधुमक्षिका पालनाचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी ई-पीक पाहणीद्वारे पीक पेरणीबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आत्माचे भूषण वाघ यांनी केले. मंडळ कृषी अधिकारी साळुंखे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत जगताप, अतुल पाटील यांनी सहकार्य केले.