जळगावात कंपनीमध्ये रसायन अंगावर पडून जखमी झालेल्या कर्मचा-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 13:21 IST2017-10-29T12:54:39+5:302017-10-29T13:21:45+5:30
मदत मिळत नाही तोर्पयत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पावित्रा

जळगावात कंपनीमध्ये रसायन अंगावर पडून जखमी झालेल्या कर्मचा-याचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - औद्योगिक वसाहत परिसरातील गीतांजली केमिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये रसायन अंगावर पडून जखमी झालेल्या सुनील चिंतामण चौधरी (वय 27, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. उदळी, ता. रावेर) या कर्मचा-याचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुनील चौधरी व त्यांच्या सोबत प्रकाश बळीराम तिवणकर (50, रा. रामेश्वर कॉलनी) हे कंपनीमध्ये काम करीत असताना गुरुवार, 26 रोजी निर्मिती विभागात लूप रिअॅक्टरमधील गॅस पाईप फाटून या दोघांच्या अंगावर रसायन पडले होते व ते जखमी झाले होते. तेव्हापासून या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सुनील चौधरी यांचा शनिवारी मृत्यू झाला.
नातेवाईकांनी घेतली कंपनीत धाव
रविवारी सकाळी सुनील चौधरी यांच्या नातेवाईकांनी कंपनीमध्ये धाव घेतली व तेथे मयताच्या कुटुंबीयास मदत मिळण्याची मागणी केली. जो र्पयत मदत मिळत नाही तो र्पयत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला. नियमानुसार जी मदत असेल ती दिली जाईल, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.