सप्तरंगाची उधळण करीत जळगावात तरुणाईची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:57 IST2018-03-03T19:57:22+5:302018-03-03T19:57:22+5:30
‘धूळवड’चा अपूर्व उत्साह : प्रत्येक कॉलनीत रंगोत्सव साजरा

सप्तरंगाची उधळण करीत जळगावात तरुणाईची धमाल
आॅनलाईन लोकमत
जळगाव , दि.३ : सप्तरंगाची उधळण करीत धूळवडचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी दिवसभर तरुणाई रस्त्यावर उतरली होती. अबालवृद्धांनी हा उत्सव जल्लोषात साजरा केला. शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंगांची उधळण करीत तरुणाईन आनंदोत्सव साजरा केला. प्रत्येक कॉलनीत हे चित्र होते.
जळगाव शहरात विविध भागात धुलिवंदन पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. एकमेकांना रंग लावून तसेच पाण्याच्या वापरात बचत करीत हा उत्सव जल्लोषात पार पडला. शहरात काही चौकांमध्ये तरुणांनी एकत्र येत एकमेकांच्या अंगावर पाणी फेकत व रंग लावत धूळवड साजरी केली.
धुलिवंदननिमित्त सर्वत्र शांतता
धुलिवंदननिमित्त शुक्रवारी शासकीय कार्यालय व बहुतांश खाजगी आस्थापनांना सुट्या होत्या. त्यातच धुलिवंदन खेळत असताना तरुण व तरुणींकडून अनोळखी व्यक्ती किंवा महिलांच्या अंगावर रंग उडविला जात होता. त्यामुळे नेहमीची वर्दळ असलेल्या गोलाणी, फुले मार्केट व बळीराम पेठ भागात शुकशुकाट होता. सुटी असली तरी कपडे खराब होतील या भीतीमुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.
तरुणाईची धूम
शहरातील मुख्य भागासह कॉलनी भागातील तरुणांनी दुचाकींवरून आपले नातलग व मित्रांच्या घराच्या दिशेने दुचाकी पळविल्या. शहरातील रस्त्यांवर धुलिवंदन खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणांची धूम गँग सुसाट वेगाने जाताना दृष्टीस पडत होती.
रेन डान्स अन् डी.जे.ची सोबत
जळगाव शहरातील नेहरु चौक मित्र मंडळातर्फे रेन डान्सचे आयोजन केले होते. येथे तरुणांच्या उत्साहाला उधाण आले होते.कॉलनी परिसरातील अनेक भागात धुलिवंदननिमित्त डी.जे.लावण्यात आला होता. डी.जे.च्या तालावरून तरुणांसह लहान मुलांनी मनसोक नृत्य केले.