लॉकडाऊनमध्येही वाहतूक शाखेची गाडी सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:53+5:302021-07-02T04:12:53+5:30
फोटो... जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू केले होते. या काळात अत्यावश्यक सेवा ...

लॉकडाऊनमध्येही वाहतूक शाखेची गाडी सुसाट
फोटो...
जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू केले होते. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही आस्थापना सुरू नव्हत्या, परिणामी अनावश्यक फिरणाऱ्यांवर निर्बंध होते. त्यामुळे रस्त्यावर दिसणाऱ्या वाहनांची संख्याही कमीच होती, असे असले तरी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २९ हजार ८५७ जणांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई एकट्या जळगाव शहरातील आहे.
मार्च महिन्यापासून खऱ्या अर्थाने कडक निर्बंध लागू झाले होते. त्याआधी देखील कोरोनाचे सावट होतेच व ते आजही कायम आहे. जानेवारी ते मे या अवघ्या पाच महिन्यात शहर वाहतूक शाखेची कारवाईची गाडी सुसाट सुटली. पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी प्रत्येक चौक व प्रमुख मार्गावर नियोजन करून अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करून अशा लोकांना आळा घातला. वारंवार सूचना देऊनही ज्यांनी नियमांचे पालन केले नाही, त्यांच्यावर नाईलाजाने कारवाईचा दंडुका उगारावा लागला. यात महामार्गावर हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ११ हजार ८८६ जणांवर तर त्याखालोखाल वाहन परवाना नसलेल्या ३ हजार ४४४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३ हजार १८१ जणांवर कारवाई करण्यात आली. भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या ३ हजार ३४२ जणांवर तर सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या २ हजार ७८८ कार चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, रेड सिग्नल जम्पिंग, अल्पवयीन असतानाही वाहन चालविणारे, रहदारीस अडथळा, दुचाकीवर तीन सीट, वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, धोकादायक वाहन चालविणे आदी प्रकारचा नियमभंग करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन असले तरीदेखील नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नव्हती.
कोट....
लॉकडाऊनमध्ये अनेक वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केले. नियम पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. अपघात झाल्यास जीवाचे व वाहनाचेही नुकसान होते. जीव धोक्यात घालून वाहन चालविणे व क्षमतेपेक्षा प्रवासी वाहनात बसविण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. पोलिसांची कारवाई सतत सुरूच राहणार आहे.
-देवीदास कुनगर, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा
एकूण कारवाई: २९ ८५७
एकूण दंड : १,२५,०१,२००
यांच्यावर झाली सर्वाधिक कारवाई
प्रकार संख्या दंड
विना हेल्मेट : ११ ८६६ ५९४३०००
विना लायसन्स : ३४४४ ६८८८००
रॅश ड्रायव्हिंग ३३४२ ३३४२०००
मालवाहू वाहनातून प्रवास : ३१८१ ७८७५००