दोन वर्षांनंतरही नुकसानाची भरपाई मिळेना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:37+5:302021-07-01T04:13:37+5:30

भडगाव : ११ जून २०१९ ला तालुक्यातील पावणे सहाशे हेक्टरवरील केळी, लिंबूसह चक्रीवादळाने पिकांचे नुकसान केले होते. प्रशासनाने तातडीने ...

Even after two years, the loss was not compensated. | दोन वर्षांनंतरही नुकसानाची भरपाई मिळेना..

दोन वर्षांनंतरही नुकसानाची भरपाई मिळेना..

भडगाव : ११ जून २०१९ ला तालुक्यातील पावणे सहाशे हेक्टरवरील केळी, लिंबूसह चक्रीवादळाने पिकांचे नुकसान केले होते. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देऊ म्हटले होते. मात्र दोन झाली तरीही शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यात सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शासनदफ्तरी नोंद आहे. शासनाच्या या दुर्लक्षामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. याबाबत आमदार किशोर पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, आजच याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री किशोरराजे निंबाळकर, तसेच विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना भरपाईसाठी अनुदान मिळावे, यासाठी पत्र देऊन संबंधितांशी चर्चाही केली. याबाबत शासनदरबारी आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

भडगाव तालुक्यात ११ जून २०१९ ला वादळाचा जोरदार पाऊस बरसला. चक्रीवादळासह पडलेल्या पावसाने सुमारे ५६७ हेक्टरवरील पीक अक्षरशः जमिनदोस्त केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. महसूल व कृषी विभागाने ८५२ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. या नुकसानीचा अहवाल अनुदानासाठी शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र दोन वर्षे होत आली तरी एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई भरपाई मिळाली नाही.

याबाबत तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांना विचारले असता या शेतकऱ्यांना अद्याप कोणताही लाभ आर्थिक मदत मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

एकीकडे रब्बी गेली, दुसरीकडे खरिपाचा हंगाम पाण्यात गेला. तिसरा म्हणजे कोरोनामुळे आरोग्याचा गेल्या दीड वर्षात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नुकसान भरपाईचा गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चारही बाजूने कुचंबणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक आमदारांनी भडगाव तालुक्यातील वादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून विधानसभेत आवाज उठवला होता.

आमदार किशोर पाटील यांनीही विधानसभेत शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी, म्हणून आवाज उठविला. आताही या पीक नुकसानीचे अनुदान मिळाले असते तर खरीप हंगामात पीक पेरण्यांना बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी या अनुदानाचे पैसे कामात आले असते. मात्र अद्यापही ते प्राप्त झालेले नाही.

चक्रीवादळाने झालेले नुकसान

क्षेत्र (हेक्टरी)

केळी : ४९३.५६ हेक्टर

लिंबू : ३६.२९ हेक्टर

मोसंबी : १६ हेक्टर

पपई : ९.३६ हेक्टर

डाळिंब : १२ हेक्टर.

२ वर्षे संपली तरी शेतकऱ्यांना केळीची नुकसानभरपाई मिळाली नाही. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पंचनामे झाले होते. आमदार किशोर पाटील, खा. उन्मेष पाटील, यांनी लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. आताच्या सरकारला माहिती नाही. पण आमदार, खासदार तेच आहेत, त्यांनी आठवण करून द्यावी. आमदार सत्तेत आहेत. आजपर्यंत एक कवडीही शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत केली नाही.

-दीपक संभाजी महाजन, राष्ट्रवादी किसान सेल, भडगाव तालुकाध्यक्ष

चक्रीवादळाने भडगाव तालुक्यात केळी, लिंबुसह पिके आडवे पडून नुकसान झाले होते. सुमारे पावणेसहा हेक्टर क्षेत्राचे पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला होता. शासनाकडून याबाबत शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

-बी. बी. गोरडे, तालुका कृषी अधिकारी भडगाव.

आज दि. ३० रोजी मी यासंदर्भात मदत व पुनर्वसनमंत्री किशोरराजे निंबाळकर व विजय वडेट्टीवार यांची मंत्रालयात संबंधितांची भेट घेउन शेतकऱ्यांना पिक नुकसानीचे अनुदान लवकर मिळावे. याबाबत लेखी पत्र दिले. आमचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल.

-किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव

Web Title: Even after two years, the loss was not compensated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.