निर्दोषत्वानंतरही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रावर दिसतेय गुन्ह्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:39+5:302021-09-08T04:21:39+5:30
जळगाव : वेगवेगळ्या गुन्ह्यांचे आरोप असलेले व्यक्ती न्यायालयातून निर्दोष मुक्त होऊनदेखील पोलिसांच्या रेकॉर्डवर ती व्यक्ती गुन्हेगारच दिसत असून, चारित्र्य ...

निर्दोषत्वानंतरही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रावर दिसतेय गुन्ह्याची नोंद
जळगाव : वेगवेगळ्या गुन्ह्यांचे आरोप असलेले व्यक्ती न्यायालयातून निर्दोष मुक्त होऊनदेखील पोलिसांच्या रेकॉर्डवर ती व्यक्ती गुन्हेगारच दिसत असून, चारित्र्य प्रमाणपत्रावरदेखील त्याचा स्पष्ट उल्लेख येऊ लागला आहे, त्यामुळे अशा अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांची नोकरीची संधी हुकली आहे, वाहन परवानादेखील अशा व्यक्तींना मिळू शकत नाही. याबाबतचे काही पुरावे मनसेचे जिल्हा सचिव ॲड.जमील देशपांडे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या लक्षात आणून दिले आहे.
शासकीय नोकरी, खासगी नोकरी, परिवहन विभागात लायसन्स काढणे, प्रवासी वाहतूक करणारी वाहने चालविण्याकरिता बॅच काढणे याकरिता पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र गुन्ह्यातून निर्दोष सुटलेल्या तरुणांच्या पोलीस पडताळणी प्रमाणपत्रावर गुन्हा दाखल होता, मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे असे नमूद असते. या प्रकारच्या नोंदीमुळे तरुणांना सरकारी नोकरी, खासगी नोकरी, शिक्षण, लायसन्स बॅच बनविण्यात मोठी अडचण येत आहे. संबंधित तरुणांना प्रशासकीय स्तरावर व सामाजिक जीवनात मानहानी स्वीकारावी लागत आहे.
दरम्यान, लग्न जमविण्यासाठी सुद्धा अनेक पालक आता पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणात मागवतात त्यामुळे त्यांच्या पुढील संसारिक जीवनात नैराश्याचे वातावरण असून, त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. काही तरुणांना नोकरीची संधी असूनही पोलीस चारित्र्य पडताळणीमुळे त्यांना नोकरी मिळू शकलेली नाही. आम्हाला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. विरुद्ध पक्षाने कोणत्याही उच्च न्यायालयात दाद मागितली नाही तर मग पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रावर गुन्ह्याचा तपशील का ? असा प्रश्न तरुणांकडून विचारला जात आहे. पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा व निर्दोष सुटलेल्या तरुणांच्या पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रावर गुन्ह्याचा तपशील येणार नाही याबाबत योग्य तो मार्ग काढावा, अशी विनंती ॲड. देशपांडे यांनी पत्राद्वारे केली आहे.