जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:06 IST2018-11-03T13:06:08+5:302018-11-03T13:06:32+5:30
शेतात सापडला मृतदेह

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
जळगाव/ शिरसोली : शिरसोली प्र.बो. येथील शुभम राजू ताडे (वय १७) या शासकीय तांत्रिक विद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थ्याने जळगाव -पाचोरा रोडवरील एका कपाशीच्या शेतात विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गुरूवारी कॉलेजला जातो असे सांगून बाहेर गेलेल्या शुभमने आत्महत्या केल्याची वार्ता सकाळी गावात पोहचताच त्याच्या आई-वडिलांनी शोक व्यक्त केला.
शुभम हा जळगाव येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात ११ वीत (एमसीव्हीसी) इलेक्ट्रीक विषयाचे शिक्षण घेत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे विद्यालय आहे. गुरूवारी त्याचा पेपर होता त्यामुळे सकाळी १० वाजता तो घरातून बाहेर पडला.
कामाला जातो म्हणून झाले दुर्लक्ष
रोज सायंकाळपर्यंत शुभम घरी येतो. मात्र तो गुरूवारी परतला नाही. काही वेळेस तो खाजगी कंपनीत कामालाही जातो. त्यामुळे कामावर गेला असेल म्हणून घरच्यांनी दुर्लक्ष केले. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही.
पोलीस पाटलाने दिली माहिती
सकाळी कुटुंबियांकडून शुभमची शोधाशोध सुरू होती. सकाळी ९ वाजता जळगाव -पाचोरा रोडवरील श्यामा फायर जवळील नारायण भगवान गवळी यांच्या शेतात एका अनोळखी मुलाचा मृतदेह पडला असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबत शिरसोली प्र.बो.चे पोलीस पाटील शरद पाटील यांना ही माहिती कळविली. त्यांनी शेताकडे धाव घेतली असता हा मृतदेह शुभमचा असल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हेकॉ. जितेंद्र राठोड, प्रकाश पवार, श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
आई-वडिल शेतमजूर
शुभमचे आई वडिल शेतमजूर आहेत. वडिल राजू भगवान ताडे (बारी), आई व मोठा भाऊ राहूल असे चौघे असतात. राहूल हा देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रीकल डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला आहे.