वीज, पाणी नाही अन निसर्गाचा कोप
By Admin | Updated: November 20, 2014 13:31 IST2014-11-20T13:31:50+5:302014-11-20T13:31:50+5:30
शेतात पाणी नाही, विजेचा प्रश्न गंभीर असून सतत निसर्गाचा कोप सुरू असल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याच्या व्यथा पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर शेतकर्यांनी मांडून मदतीची अपेक्षा केली.

वीज, पाणी नाही अन निसर्गाचा कोप
जळगाव/बोदवड/पहूर : शेतात पाणी नाही, विजेचा प्रश्न गंभीर असून सतत निसर्गाचा कोप सुरू असल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याच्या व्यथा पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर शेतकर्यांनी मांडून मदतीची अपेक्षा केली.
जामनेर आणि बोदवड तालुक्यांसह विविध ठिकाणी पालक सचिव देवरा यांनी अधिकार्यांच्या ताफ्यासह भेटी दिल्या. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा कृषी अधीक्षक किसन मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, जळगाव प्रांत अधिकारी अभिजित भांडे, भुसावळ प्रांत अधिकारी विजय भांगरे उपस्थित होते.
बोदवड येथे पीक कापणी प्रयोग पैसेवारीची पाहणी पालक सचिव देवरा यांनी केली.शेलवड शेतशिवारातही ते गेले होते. शेतकर्यांच्या व्यथाही त्यांनी जाणून घेतल्या.
शेलवड शिवारातील शेतकरी रघुनाथ मुकुंद जावरे यांच्याशीही देवरा यांनी चर्चा केली. यंदा पावसाने दगा दिल्याने शेतात पीक आहे; पण त्यात दाणेच भरलेले नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. तर शेलवड येथील दीपक माळी यांनी ग्रामस्थांसह अधिकार्यांना वीज बिल माफी, तसेच शैक्षणिक फीमाफीची सवलत द्यावी, अशी मागणी केली.
दुष्काळाची पाहणी
सप्टेंबर महिन्याच्या नजर पीक पाहणीत बोदवड तालुक्याची पैसेवारी ही ५0 पैशांच्या आत असून कापणीनंतर हा तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असल्याची माहिती तहसीलदार एस.ए. खैरनार यांनी दिली. पाहणीदरम्यान बोदवड तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी ए.एफ. सरदार, एस.आर. तळेले, ए.आर. निकुंभ, ए.एस.सानप, आर.ए. कागणे, आर.एस. जगताप, बोदवड मंडळ अधिकारी योगेश पाटील व तलाठी, कोतवाल उपस्थित होते.
जामनेरात उत्पादन घटले
कमी पावसामुळे अवर्षणसदृश परिस्थिती जामनेर तालुक्यात निर्माण झाली आहे. यामुळे खरीप हंगाम संपल्यात जमा आहे व शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आला आहे. पहूर येथील रघुनाथ आनंदा पाटील यांनी शेतात बाजरी पीक काढले. पाण्याअभावी एका गुंठय़ाला २ किलो तीनशे ग्रॅम एवढेच उत्पादन झाले असून शासनाच्या धोरणानुसार या ठिकाणी १४ किलो बाजरी उत्पन्न होणे अपेक्षित होते. यांची पाहणी देवरा यांनी केली. विजेच्या प्रश्नासह शेतकर्यांच्या कापसाला भाव नाही, कोरडवाहू शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, अशा व्यथा मांडण्यात आल्या. याप्रश्नी शासनाकडे अहवाल पाठविला जाणार आहे. (वार्ताहर)
-------------------
कापूस आणि ज्वारी पिकाची सरासरी उत्पादकता कमी झाल्याची माहिती पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. जामनेर, बोदवड या दोन्ही तालुक्यात पिकांची स्थिती दयनीय आहेच. मात्र इतरही तालुक्यांमध्ये कापूस व ज्वारी पिकाची सरासरी उत्पादकता खूपच कमी आहे. शेतकर्यांना काय मदत देण्यात येईल, याबाबत राज्य शासन पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे देवरा यांनी सांगितले. पीक पाहणीनंतर पालक सचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील चारा, पाणीटंचाई, रोहयोची कामे, पीक परिस्थिती, सहकार क्षेत्र याबाबतचा आढावा घेतला. देवरा यांचा दौरा नियोजनाप्रमाणे झाला. पीक पाहणीसाठीही त्यांनी रस्त्यावरच्याच गावांची निवड केली. दोन्ही तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती असताना देवरा यांनी दोन तासात दौरा आटोपला.