मोयखेडा दिगर येथील तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 18:18 IST2020-02-22T18:15:17+5:302020-02-22T18:18:44+5:30
मोयखेडा दिगर येथील समाधान श्रावण सपकाळे याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

मोयखेडा दिगर येथील तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील समाधान श्रावण सपकाळे या ३५ वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. २१ रोजी रात्री ही घटना घडली. २२ रोजी सकाळी ती उघडकीस आली.
सूत्रांनुसार, शेतात पेरलेला मका व गहू या पिकांना पाणी भरण्यासाठी समाधान सपकाळे हा २१ रोजी रात्री नेहमीप्रमाणे शेतात गेलेला होता. रात्रपाळी करून तो सकाळीच घरी येत असे. परंतु २२ रोजी सकाळी वेळ होऊनही तो घरी आला नसल्याने त्याचा मुलगा संदेश हा शेतात त्याला पाहण्यासाठी गेला. तेव्हा तो डीपीजवळ शॉक लागून मृत्युमुखी पडलेला होता. आपल्या पित्याचा मृतदेह समोर पाहताच मुलाने एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.