खडसेंनी पवारांना केला वाकून नमस्कार, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:34 IST2018-03-31T16:34:11+5:302018-03-31T16:34:11+5:30
शरद पवार यांचे भाषण सुरू असताना खडसे कार्यक्रमस्थळी पोहोचले.

खडसेंनी पवारांना केला वाकून नमस्कार, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
जळगाव: भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी जळगावात झालेल्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना व्यासपीठावरच वाकून नमस्कार केला. खडसेंच्या या कृतीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगावात शुक्रवारी अनेक विकासकामांची उद्घाटने होणार होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत या कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळले. मात्र, एकनाथ खडसे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहायचे टाळण्यासाठीच त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे केल्याची चर्चा काल रंगली होती. यानंतर एकनाथ खडसे यांनी नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली.
यापैकी जैन हिल्सवर आयोजित पद्मश्री अप्पासाहेब पवार उच्च कृषितंत्र पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात शरद पवार हेदेखील उपस्थित होते. शरद पवार यांचे भाषण सुरू असताना खडसे यांचे आगमन झाले होते. त्यानंतर शरद पवार भाषण करून परत येत असताना खडसे उठून उभे राहिले आणि पवार जवळ येताच खडसेंनी त्यांना वाकून नमस्कारही केला. याच कार्यक्रमानंतर शरद पवार आणि खडसे यांच्यात एकातांत 10 मिनिटे चर्चाही झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.