लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत वेगात राबविली जात असून ६० टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यातच गेल्या ५८ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नसल्याने हा लसीकरणाचा प्रभाव असल्याची एक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच गंभीर रुग्णांची संख्याही गेल्या दोन महिन्यांपासून कमी झाल्याने ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी ते पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. शिवाय लस पुरेशी उपलब्ध झाल्यास पुढील पंधरा दिवसांत जिल्हा सुरक्षित होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
१६ जुलै रोजी मृतांची संख्या २५६५ होती. ती गेल्या ५८ दिवसांपासून स्थिर आहे. शिवाय तेव्हापासूनच रुग्णसंख्या ही एका दिवसाला आता दहापेक्षा कमी आढळून येत आहे. शिवाय लसीकरणाचा वेग वाढला आहे. शनिवारी शहरात ५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले. जिल्हाभरात आता एका दिवसाला सव्वा लाखांपर्यंत लसीकरण होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा कालावधीही पुढे जात असल्याचेही सांगितले जात आहे.
काय होते लसीकरणाने
लसीकरणानंतर चौदा दिवसांनी तुमच्या शरीरात ॲन्टीबॉडिज तयार होतात. या अॅन्टीबॉडिज दुसऱ्या डोसनंतर सहा महिने ते एक वर्षापर्यंत तुम्हाला सुरक्षित करू शकतात. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुम्हाला बाधा झाली तरी आजार गंभीर रूप धारण करणार नाही, त्याचाच परिणाम की काय जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांमध्ये गंभीर होण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे मृत्यू नसणे हा लसीकरणाचा प्रभाव असू शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी म्हटले आहे.
लवकरच १२ वर्षांपुढे लस
१२ ते १८ वयोगटासाठी लवकरच लस उपलब्ध होणार असून येत्या पंधरा दिवसांत या वयोगटाचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. जळगावात लसीचा प्रभाव किंवा हर्ड इम्युनिटी या दोन शक्यतांमुळे मृत्यू थांबले असू शकतात, असेही ते म्हणाले. लस उपलब्ध झाल्यास पुढील पंधराच दिवसात संपूर्ण २८ लाख जनता सुरक्षित होईल, असेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थिती काय
सक्रिय रुग्ण २५
लक्षणे असलेले रुग्ण ३
लक्षणे नसलेले रुग्ण २२
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण १
अतिदक्षता विभागातील रुग्ण १
मृत्यूदर : १.८० टक्के
गृहविलगीकरणात २२