लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास होऊ शकते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:15+5:302021-08-19T04:21:15+5:30
जळगाव : तंत्रज्ञान हे प्रगतीचे लक्षण मानले जाते. तंत्रज्ञानामुळे बसल्या जागी अनेक गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ...

लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास होऊ शकते फसवणूक
जळगाव : तंत्रज्ञान हे प्रगतीचे लक्षण मानले जाते. तंत्रज्ञानामुळे बसल्या जागी अनेक गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्यामुळे वेळ, पैसा, शारीरिक झीज याची बचत होऊ लागली आहे. मात्र कधीकधी हे तंत्रज्ञान घातकही ठरू लागले आहे. खास करून बँकिंग व्यवहार व ऑनलाइन व्यवहार यात सायबर गुन्हेगारांकडून लोकांची फसवणूक केली जात आहे. डिजिटल पेमेंटप्रणालीत अनेकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आपण बघितली आहेत. त्यातच लॉटरी लागल्याचे संदेश, ई-मेलमुळे अनेकांची बँक खाती रिकामी होऊ लागली आहेत. काही नागरिकही लोभापायी त्याला प्रतिसाद देतात. मात्र, क्षणातच बँक खात्यातून पैसे गायब झाल्याचे लक्षात येते. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर पोलिसांत धाव घेतली जाते. मात्र, त्याचा नंतर उपयोग होत नाही. जळगाव जिल्ह्यात सद्य:स्थितीत अशा घटना घडल्याची पोलिसांत अद्याप तक्रार नाही; परंतु मोठ्या शहरांमध्ये अशा घटना घडू लागल्या आहेत. त्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
ही घ्या काळजी
लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा ई-संदेश आल्यावर ते उघडून पाहू नयेत, उघडले तरी त्यावर असलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नये. याच लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मागितली जाते. अनेक जण हीच वैयक्तिक माहिती शेअर करतात. यात बँकेचे खाते नंबर, एटीएम, कार्ड नंबर, सीव्हीसी, कोड नंबर यासह कधी कधी एटीएम पीन नंबरही शेअर करतात. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचे दिसून येते. परिणामी, असे ई-मेल किंवा संदेश आले तर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे, तरच लहान-मोठ्या फसवणुकीपासून सावध राहू शकतो. हीच काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
फिशिंग ई-मेल
एखाद्या कंपनीच्या नावाने ई-मेल्स किंवा मेसेज पाठविले जातात. (फिशिंग इमेल) असे मेल ओपन करून त्यांना प्रतिसाद देणे टाळणे गरजेचे आहे. अन्यथा आपला पासवर्ड, कोड चोरी करून फसवणूक केली जाऊ शकते. जळगाव जिल्ह्यात २०१८ मध्ये अशा प्रकारच्या दोन घटना घडलेल्या असून, सायबर पोलिसांत गुन्हे दाखल झालेले आहेत.
वेबसाइटची सुरुवात ‘एचटीटीपीएस’पासून झाली आहे का?
सामान्यत: बहुतांश वेबसाइटची सुरुवात एचटीटीपीएसपासून होत असते. यामुळेच नागरिकांचा सहजपणे आलेल्या ई-मेल संदेशावर पटकन विश्वास बसतो. भरवसा करीत ई-मेल उघडून वैयक्तिक माहिती शेअर केली जाते. तिथेच नागरिकांची फसवणूक होत असते. अशा सदोष वेबसाइटच्या लिंकिंगपासून सावध राहावे. या शब्दापासून सुरू होणारी वेबसाइट खरी असेल, असे नाही.
लाॅटरी लागली म्हणून जिल्ह्यात फसवणूक नाही
लॉटरी लागली म्हणून लोकांची फसवणूक झाल्याची जळगाव जिल्ह्यात एकही तक्रार नाही. मात्र, फिशिंग ई-मेलबाबत २०१८ मध्ये दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सायबर विभागाकडून सायबर गुन्ह्यासंदर्भात वेळोवेळी शिबिरे, मार्गदर्शन करण्यात येते. आपल्याला लॉटरी लागली आहे, असा मेसेज किंवा ई-मेल आल्यानंतर अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यापासून सावध राहण्यासाठी कोणत्याही फेक मेसेज, ई-मेलला थारा देऊ नये, सावधानता बाळगावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले आहे.