लोकमत न्यूज नेटवर्क
महिंदळे, ता. भडगाव : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांची फरपट होत आहे. पीक पाहणी झाली नाही तर आपल्याला शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही या विवंचनेत शेतकरी आहेत.
मोबाइल घेऊन आपल्या शेताच्या बांधावर शेतकरी दिसत आहेत; पण नेट प्रॉब्लेम, तर कधी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड होत नाही आणि
शासनाने परिपत्रक काढले...१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान शेतात जा. मोबाइल काढा. त्यावर ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा. त्यात माहिती भरा. सुरुवातीला आलेला ४ अंकी ओटीपी कायमचा लक्षात ठेवा. कोणतं पीक आहे हे त्यात लिहा. पिकासोबतचा तुमचा फोटो अपलोड करा. तलाठी हे काम करणार नाही.
सगळं तुमचं तुम्हीच करा. नांगरा, कोळपा, पेरा, धान्य काढा आणि मातीमोल किमतीत बाजारात विकून या प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्ड पाहिजे, सातबारा पाहिजे, फायदा झाल्यास सरकार डंका वाजविणार आमच्या धोरणाचं यश. तोटा झाल्यास निसर्गावर ढकलणार किंवा शेतकरी व्यसनी असतात म्हणणार, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
शेतकरी पीक पेरा लावण्यासाठी मोबाइलवर ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करू लागले आहेत आणि ओटीपी लक्षात ठेऊन माहिती भरायला सुरुवातही करीत आहेत. नाव, गाव, गट नंबर, सर्व्हे नंबर सगळे टाकून झाले. सोयाबीन, कपाशी, केळी, भेंडी, मका, बाजरी, ज्वारी, आदींसोबत उभा राहून फोटो काढला; पण डाउनलोड होईना, कारण रेंज येत नाही. आता ही तक्रार कोणाकडे करायची? उन्हातान्हात उभे राहून रेंज येण्याची वाट पाहत बसावे लागत आहे. तरीही जमिनीची नोंद टाकली व त्यात आपण पेरणी केलेल्या पिकांची नोंद केली तर पलीकडून मेसेज येतो. तुमच्या नावाने तेवढी जमीनच नाही. ही समस्या आपल्या टेक्नॉलॉजीची मग आता हा टेक्निकल प्रॉब्लेम कोण दूर करणार? असा सवालही केला जात आहे.
प्रतिक्रिया
शासनाने आता जो शेतकऱ्यांचा पीक पेरा तलाठ्याकडून काढून घेऊन ऑनलाइन केला; पण ग्रामीण भागात या ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही पीकपेरा लागत नाही. आम्ही काय करावे, असा प्रश्न पडला आहे. ही ऑनलाइन पद्धत शासनाने बंद करून तलाठ्याकडील पीक पेरा कायम ठेवावा.
गोपीचंद धनराज देवरे, शेतकरी, महिंदळे, ता. भडगाव
आम्हाला शासनाच्या विरोधात जायचे नाही. शासनाची ई-पीक पाहणी योग्यच आहे; पण ग्रामीण भागात अजूनही ऑनलाइन पद्धत वापरण्यास शेतकरी सक्षम झालेला नाही व आजही अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत. त्यामुळे पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी रेंज राहत नाही, तर काहींना ऑनलाइन करता येत नाही. यावर कायम उपाय काढणे आवश्यक आहे.
-उत्तमराव शामराव पाटील,
अध्यक्ष, वि. का. सो., महिंदळे