भरपावसाळ्यात महाबळवासीयांवर आली पाण्यासाठी भटकंतीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:51+5:302021-06-18T04:12:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह शहरात एकीकडे पावसाचे दमदार आगमन झाले असताना, पाणीटंचाईची समस्या मार्गी लागत आहे. मात्र, ...

During the rainy season, the people of Mahabal had to wander for water | भरपावसाळ्यात महाबळवासीयांवर आली पाण्यासाठी भटकंतीची वेळ

भरपावसाळ्यात महाबळवासीयांवर आली पाण्यासाठी भटकंतीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह शहरात एकीकडे पावसाचे दमदार आगमन झाले असताना, पाणीटंचाईची समस्या मार्गी लागत आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील महाबळ भागात भरपावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना रात्री- बेरात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच नागरिकांना मनपा कर्मचाऱ्यांकडे पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, मनपाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाची पातळीदेखील आता वाढू लागली आहे. गेल्यावर्षी पुरेसा पाऊस झाल्यानंतर जळगावकरांना ऐन उन्हाळ्यातदेखील पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. मात्र, मनपा पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजन व उदासीनतेमुळे शहरातील महाबळ परिसरातील नागरिकांना भरपावसाळ्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनदेखील मनपा प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

टाक्यांमध्ये मुबलक पाणी, घरांमध्ये मात्र पोहोचेना

महाबळ परिसराचे नगरसेवक नितीन बरडे यांच्याकडे स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर बरडे यांनी मनपाकडे चौकशी केली असता, या भागातील पाण्याचा टाक्या पूर्णपणे भरत आहेत. मात्र, घरांपर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, याठिकाणी पाण्याची मोटार जुनाट असून, मनपाकडून ती दुरुस्तदेखील केली जात नसल्याने पाण्याची उचल कमी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे उंच भागात पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत नितीन बरडे यांनी गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली, तसेच याबाबत लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती बरडे यांनी दिली.

Web Title: During the rainy season, the people of Mahabal had to wander for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.