कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयाने अनुभवला दर दिवसाला ‘डॉक्टर डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:40+5:302021-07-01T04:13:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : कोरोना काळात रुग्णांवर उपचार करून त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ देण्याची अत्यंत ...

During the Corona period, the sub-district hospital experienced a 'Doctor's Day' every day. | कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयाने अनुभवला दर दिवसाला ‘डॉक्टर डे’

कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयाने अनुभवला दर दिवसाला ‘डॉक्टर डे’

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर : कोरोना काळात रुग्णांवर उपचार करून त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ देण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका डॉक्टर बजावत होते. ‘डॉक्टर डे’निमित्त डॉक्टरांचा सत्कार, डॉक्टरांच्या कार्याचा गौरव आणि समाजात डॉक्टरांविषयी वेगवेगळी जनभावना आणि डॉक्टरांच्या रुग्णसेवेचे प्रतिबिंब अनेक प्रकारे उमटून आले, परंतु एखाद्या सरकारी डॉक्टरने केलेल्या विश्वास संपादनाच्या बळावर त्यांनी कोरोना काळात केलेल्या समर्पित रुग्ण सेवेचा दर दिवसाला सत्कार मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अनुभवयास आला.

आरोग्य व्यवस्थेत कोरोनाने अनेक स्थित्यंतरे बदलविले आहे. डॉक्टरांच्या परिश्रमी रुग्णसेवेमुळे उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांसाठी ‘आधार’ बनले. डॉक्टरांची रुग्णांप्रती समर्पित सेवाभाव आणि येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे आणि त्यांच्या टीमने रुग्णसेवेत संपादित केलेल्या विश्वासामुळे मुंबई, पुणे येथे उपचार घेण्यास सक्षम असलेले रुग्णही मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात भरती झाले. उपचार घेतले आणि खात्रीने बरे झाले.

कोरोना काळात वैद्यकीय व्यवसायात रुग्णांची लूट हा विषय चर्चेत असताना त्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मोफतच्या उपचाराची प्रशंसा होत होती, दररोज येथून सुटी घेणारे रुग्ण डॉक्टरांचा सत्कार करत होते, कोणी डॉक्टरांना देव म्हणून चरण स्पर्श करीत होते, तर कोणी आनंदात इतर रुग्णांना औषधी, साहित्य वाटप करीत होते. ‘डॉक्टर डे’निमित्त सत्कार हा प्रासंगिक, परंतु अवघ्या कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे डॉ. शोएबखान यांचा वारंवार होणारा सत्कार समर्पित रुग्णसेवेचे जनसामान्यांमधून मिळणारे प्रमाणपत्र होते. त्याच्या टीममध्ये आयूषचे डॉक्टर यांनीही रुग्णांचा विश्वास जिंकला.

या समर्पित रुग्णसेवेने भारावलेले नागरिक, व्यापारी, राजकारणी आणि बरे झालेले रुग्ण यांनी सढळ हाताने मदत करून लोकसहभागातून ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर, आवश्यक औषधी व इतर साहित्य दिले.

एखादे शासकीय रुग्णालय डॉक्टरांनी केलेल्या विश्वास संपादनाच्या बळावर रुग्णांना उपचारासाठी नामांकित हॉस्पिटल सोडून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पसंतीचे ठरावे ही शासनाच्या आरोग्य सेवेसाठी गौरवशाली बाब होय. त्याचाच परिपाक म्हणून डॉक्टरांवरील विश्वासावर भुसावळ, फैजपूर, सावदा, रावेर, मलकापूर, नांदुरा, जळगाव जमोद येथील रुग्ण मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत नव्हे, तर येथे बेड मिळण्यास धडपड करीत होते.

Web Title: During the Corona period, the sub-district hospital experienced a 'Doctor's Day' every day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.