पावसामुळे पक्व बोंडे पडताहेत काळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:18 IST2021-09-22T04:18:23+5:302021-09-22T04:18:23+5:30

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, विद्यार्थी सर्रास शेतावर जात आहेत. मागील आठवड्यात पावसाने काहीशी उसंत घेतली. पुन्हा २० तारखेपासून पावसाचा ...

Due to the rains, the ripe bonds are falling | पावसामुळे पक्व बोंडे पडताहेत काळी

पावसामुळे पक्व बोंडे पडताहेत काळी

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, विद्यार्थी सर्रास शेतावर जात आहेत. मागील आठवड्यात पावसाने काहीशी उसंत घेतली. पुन्हा २० तारखेपासून पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. अधून-मधून डोक्यावरचे ढगांचे ढिगार तुटून पडत आहे. अशातच कपाशीच्या झाडावर आहे ती काळी बोंडे, कवडी कापूस शेतातून घरात आणण्यासाठी मोठी कसरत होत आहे. वेचणीस अधिक खर्च येत आहे. निघणाऱ्या या कापसातून वेचणीचा खर्चदेखील निघणार नाही त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. अतिपावसाने कपाशीच्या झाडावरच कैऱ्या सडल्या. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार बागायती कपाशीवर पंचवीस -तीस ते साठ-सत्तर अशा कैऱ्या आहेत. काळ्या पडलेल्या कैऱ्यांना डब्बा म्हटले जाते. असा कापूस व कवडी वेचण्यास अधिक वेळ लागतो. मागील आठवड्यात बऱ्याच क्षेत्रावरील कपाशीची बोंडेदेखील फुटली आहेत. अशा ठिकाणी कापसाची पहिली वेचणी सुरू झाली आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत १५० रुपये तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २०० रुपये रोज कवडी कापसाच्या वेचणीला आहे. एक मजूर मोठ्या मुश्किलीने दहा-विस किलो कापूस वेचतो. पहिल्या वेचणीचा माल वजनदार असतो. एक किलो कापूस वेचणीला पाच, सहा, सात रुपये मोबदला मिळतो. एक सशक्त मजूर तीस, पन्नास किलो तर क्विंटललादेखील हात लावतो. परंतु किलोप्रमाणे कापूस वेचणारे मजूर यावर्षी अद्याप कपाशी चांगली फुटलेली नसल्याने रोजंदारीनेच वेचणीला येत आहेत. सध्या कोरोनामुळे शाळांचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. शेतकरी व गरीब विद्यार्थ्यांच्या घरात एकच मोबाइल पालंकाकडे असतो.आई-वडील शेतावर कापूस वेचणीला गेल्यानंतर अशा घरातील शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग होत नाही. शिवाय मोबाइलला नेटचा रिचार्ज करायलादेखील पैसे नाहीत. म्हणून विद्यार्थी कापूस वेचणीला जात आहेत.यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीला मदत होत आहे.

चौकट-- यंदा दिवाळीआधीच वाजणार कापसाचे दिवाळे

मान्सूनपूर्व अर्थात बागायती कापसात अतिपावसाने दुसरा बहार जमिनीवर पडला तर पहिल्या बहारातील पक्व बोंडे सडली. आता ही कपाशी पिवळी, लाल पडून पाने करपू लागली आहेत. गळू लागली आहेत. पुन्हा ती हिरवी होईल का नाही? झाली तरी बहार केव्हा लागेल? शेंदरी बोंडअळीची धास्ती आहेच. यामुळे असे क्षेत्र लवकर खुर्राट (उलगवाडी) होणार आहे. हे क्षेत्र सर्वाधिक आहे. दिवाळी अजून एक-दिड महिना दूर आहे तोवर या कापसाला उपटून फेकावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. एरव्ही दिवाळीनंतरदेखील दीड-दोन महिने कापूस वेचणीचा हंगाम चालतो. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना तर मजुरांच्या हातांनादेखील बराच दिवस कापूस वेचणीचे काम मिळत असे. यंदा तशी स्थिती नाही.

Web Title: Due to the rains, the ripe bonds are falling