कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:05+5:302021-06-19T04:12:05+5:30
पंप जळाला : ग्रामस्थांचे पावसाळ्यात पाण्यासाठी हाल लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : नांद्रा खुर्द येथील तापी नदीवरील सामूहिक पाणी ...

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे
पंप जळाला : ग्रामस्थांचे पावसाळ्यात पाण्यासाठी हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : नांद्रा खुर्द येथील तापी नदीवरील सामूहिक पाणी योजनेचा पंप कमी दाबाच्या
वीजपुरवठ्यामुळे जळाल्याने ममुराबाद गावातील पाणीपुरवठा
भर पावसाळ्यात ठप्प झाला आहे. पर्यायी व्यवस्थेअभावी ग्रामस्थांचे हाल
झाले आहेत. त्याबद्दल सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ममुराबाद
गावासाठी नांद्रा खुर्द येथील सामूहिक योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा
करण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी पंपिंग सेंटरवर तीन ते चार पंपसुद्धा
उपलब्ध आहेत. त्यातील एक पंप नादुरुस्त झाला तर तत्काळ दुसरा पंप
कार्यान्वित करण्याची सोय त्या ठिकाणी आहे. प्रत्यक्षात सततच्या कमी
दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अधिक अश्वशक्तीचे पंप सुरळीतपणे चालत नसल्याने २५ अश्वशक्तीच्या एकुलत्या एक पंपाच्या साहाय्याने वेळ निभावण्याचा केविलवाणा प्रयत्न ममुराबाद ग्रामपंचायतीकडून काही दिवसांपासून सुरू
आहे. त्यातही पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने जेमतेम सुरू असलेला
एकमेव पंपही आता जळाला आहे. अर्थातच एकही पंप सुस्थितीत नसल्याने
ममुराबादचा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. ग्रामपंचायतीने
युद्धपातळीवर हालचाल करून जळालेला पंप तापी नदीच्या काठावरील विहिरीतून
बाहेर काढून दुरुस्तीसाठी पाठविला आहे. मात्र तो दुरुस्त होईपर्यंत
ममुराबादचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्रामस्थांना
भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.
----------------
(कोट)..
गेल्या
काही दिवसांपासून ममुराबाद सामूहिक पाणी योजनेच्या तापी नदीवरील पंपिंग
सेंटरला खूपच कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पंप जाळण्याचे प्रकार
सुरू झाले असून, पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. महावितरणने वीजपुरवठा
सुरळीत केल्यानंतरच समस्या दूर होऊ शकेल.
- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद