वाढत्या प्रदुषणामुळे जळगावात जगणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:11 IST2019-06-05T12:11:09+5:302019-06-05T12:11:38+5:30
पाणी दूषित, वायूदूषित, अन् ध्वनी प्रदूषणाचाही पडलाय विळखा

वाढत्या प्रदुषणामुळे जळगावात जगणे झाले कठीण
जळगाव : शहरातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून, ध्वनी, वायु व जल प्रदुषणामुळे जळगावात राहणे देखील आता कठीण झाले आहे. जळगाव शहर राज्यातील इतर शहरांच्या दृष्टीने औद्योगिकीकरणापासून मागे असले तरी प्रदुषणात मात्र वाढ होत आहे.
शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याचा कामामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. यामुळे शहरातील हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात वाघूर धरणाकडून येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा जलवाहिनीत अनेक ठिकाणी गळती असल्याने जलप्रदुषण देखील होत असून, नागरिकांना अनेकदा अशुध्द जलपुरवठा होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. मेहरुण तलावात परिसरातील घरांचे सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने मेहरुण तलावातही प्रदुषण होत असून, यामुळे तलावातील व परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पाला लागणाºया आगीतून निघणाºया धुरामधून मिथेन वायु बाहेर पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे.
प्रशासन काय उपाय करतेय?
जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात तब्बल ६६ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग तर आहेच, त्यासोबतच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, नागरिकांनाही या वृक्ष लागवड मोहीमेत सहभागासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी वनविभागाच्यावतीने जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.
सवयींमध्ये बदल केल्यास पर्यावरणाचा समतोल शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ झाडांची संख्या मात्र कमी होत आहे़ यामुळे मोठ्या शहरांची आजची हवेची प्रदुषणाची पातळी बघितली तर ती धोकादायकच आहे, यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या सवयी बदल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागू शकतो, असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले आहे़ झाडे लावणयसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहनही या तज्ञांनी केले आहे़
तज्ञांच्या मते काय आहे
छोट्या छोट्या बाबींसाठी वाहनांचा वापर शक्यतोवर टाळा
वीजेची बचत करा, अनावश्यक वापर टाळा, दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहीत करा
प्लास्टीक बंदीची मानसिकता स्वत:मध्ये विकसीत करा
वृक्षारोपणासह त्याच्या संवर्धनावर भर द्या