अतिवृष्टीमुळे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क केले माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 04:53 IST2019-11-10T04:53:54+5:302019-11-10T04:53:58+5:30
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सन २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीमुळे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क केले माफ
जळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सन २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. अंदाजे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पालक शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका व्यवस्थापन परिषद सदस्यांनी मांडली. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परीक्षांच्या कामाचे मानधन प्राध्यापकांनी घेऊ नये, असे आवाहन प्राध्यापकांच्या दोन्ही संघटनांना व्यवस्थापन परिषद सदस्यांच्यावतीने करण्याचेही ठरविण्यात आले.