चालकाच्या प्रसंगावधानाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:04+5:302021-08-19T04:21:04+5:30

भडगाव : पारोळा - चाळीसगाव मार्गावरील थरार भडगाव, जि. जळगाव : वेगाने धावणाऱ्या बसचे एका बाजूचे सर्वच पाटे ...

At the driver's discretion | चालकाच्या प्रसंगावधानाने

चालकाच्या प्रसंगावधानाने

भडगाव : पारोळा - चाळीसगाव मार्गावरील थरार

भडगाव, जि. जळगाव : वेगाने धावणाऱ्या बसचे एका बाजूचे सर्वच पाटे तुटल्याने बस २०० मीटर फरपटत गेली. तरीही स्टेअरिंगवरील नियंत्रण ढळू न देता व क्षणाचाही विलंब न लावता तिला रस्त्याच्या कडेला लावण्याचे चातुर्य, धैर्य चाळीसगाव आगाराचे चालक विजय मदनलाल शर्मा यांनी दाखविले. या प्रसंगावधानाने बसमधील ७० प्रवासी सुखरूप बचावले. ही थरारक घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पारोळा-चाळीसगाव दरम्यान शिंदी गावाजवळ घडली.

चाळीसगाव आगाराची बस (एमएच२४/बीटी२०७८) ही पारोळा येथून दुपारी सव्वाबारा वाजता चाळीसगावसाठी निघाली. बसमध्ये ७०-८० प्रवासी होते. रस्त्यात एका नाल्यावर जोराचा आवाज होत प्रवाशांना धक्का बसला. बसच्या डाव्या बाजूचे सर्वच पाटे व पिन तुटली. बस एका बाजूने जमिनीवर टेकत जोराने हेलकावे खात रस्त्याच्या एका कडेला फरफटत जाऊ लागली. बसचालक विजय शर्मा यांनी क्षणाचाही विलंब न लावता वेग नियंत्रणासाठी सुरुवातीला गिअर बदलविला. त्याच जोडीने नाल्यात जाण्यापासून बसला रोखले.

अन्यथा नाल्यात व खोलवर असलेल्या बाजूच्या शेतात वेगाने पलटी होत प्रवाशांच्या जिवावर बेतले असते. महिला वाहक संगीता पाटील यांनी प्रवाशांना धीर दिला. हा थरार अनुभवणाऱ्या प्रवाशांनी पटापट बसमधून उतरत चालकाला धन्यवाद दिले व आभार मानले. महिला प्रवाशांनी चालकाच्या रुपात देवच भेटला व काळ आला होता पण वेळ आली नाही, अशी भावना व्यक्त केली.

Web Title: At the driver's discretion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.