खासगी वाहनाच्या परवान्यावर चालवा आता अवजड व प्रवासी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:26+5:302021-09-08T04:21:26+5:30
जळगाव : खासगी वाहनाच्या परवान्यावर आता हलकी मालवाहू व प्रवासी वाहतूक करणारे वाहनही चालविता येऊ शकणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ...

खासगी वाहनाच्या परवान्यावर चालवा आता अवजड व प्रवासी वाहने
जळगाव : खासगी वाहनाच्या परवान्यावर आता हलकी मालवाहू व प्रवासी वाहतूक करणारे वाहनही चालविता येऊ शकणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन राज्याच्या परिवहन विभागाने नवीन परिपत्रक काढून सर्व आरटीओ कार्यालयांना याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या निर्णयामुळे आता अवजड वाहनासाठी वेगळा परवाना काढण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालकांची पिळवणूक थांबणार आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार सध्या वाहनाच्या प्रकारानुसार चालकाकडे वाहन परवाना आवश्यक आहे. कार, दुचाकीसह इतर हलक्या वाहनांसाठी ‘नॉन ट्रान्सपोर्ट’ आणि अवजड वाहनांसाठी ‘ट्रान्सपोर्ट’ अशा प्रकारचे परवाने आरटीओकडून दिले जातात. ‘नॉन ट्रान्सपोर्ट’ प्रकारातील वाहनधारक केवळ खासगी वाहन चालवू शकतो, अवजड व प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालविले, तर त्याच्यावर कारवाई केली जात होती. ट्रान्सपोर्ट प्रकारातील परवानाधारक खासगीसह व्यावसायिक प्रवासी आणि मालवाहू वाहने चालवू शकतात, नव्या निर्णयानुसार आता हलक्या वाहनासाठी एकच परवाना दिला जाणार असून, त्यावर खासगीसह मालवाहू हलकी वाहने चालविता येणार आहेत. मध्यम आणि प्रवासी, मालवाहू जडवाहनांसाठी मात्र पूर्वीप्रमाणेच ट्रान्सपोर्ट संवर्गातील परवान्याची आवश्यकता असेल. ई-कार्ट आणि ई-रिक्षा ही वाहने परिवहन संवर्गात नोंदली जात नाहीत, त्यामुळे ही दोन्ही वाहने चालविण्यासाठी ई-कार्टचा परवाना पुरेसा ठरणार आहे. ई-रिक्षा चालविण्यासाठी ई-कार्ट परवान्यासह बॅज काढणे आवश्यक आहे. राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी याबाबतचा आदेश काढला असून, नव्या नियमानुसार संगणक प्रणालीत आवश्यक बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.