जळगाव : हार्डवेअरच्या दुकानात चोरट्यांनी दोन वेळा चोरी केली, तिसऱ्या वेळीही चोरी सफल झाली, मात्र यावेळी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नेरी नाका परिसरातील मटण मार्केट शेजारी जितू बलराम आहुजा (वय ३४, रा. सिंधी कॉलनी) यांच्या मालकीच्या अशोक हार्डवेअर या दुकानात हा प्रकार घडला असून चोरट्यांनी ९६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हार्डवेअरच्या या दुकानात १३ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बाजूच्या कुंपणावरून उडी घेत दुकानाच्या मागील बाजूच्या खिडकीचा पत्रा वाकवून दुकानात प्रवेश केला. दुकानातून बोर मशीन, हॅमर मशीन, कटर मशीन आणि डोअरचे ३० किट असा सुमारे ९६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून दोन चोरटे दुकानात माल चोरून बाहेर उभ्या एका गाडीत ठेवताना दिसून येत आहेत. या दुकानात यापूर्वीही दोनदा चोरी झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्यानेच दोन्ही वेळा चोरी केली आहे. मात्र तेव्हा एक हजार रुपयांची रोकड चोरी झाली होती, त्यामुळे आहुजा यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. तिसऱ्यांदा चोरी करून चोरट्याने पोलिसांना आव्हान दिले आहे. दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर जितू अहुजा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास हवालदार तुषार जावरे करीत आहेत.