दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:01+5:302021-05-06T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासाठी आता ७० हजार लसींचा साठा मिळाला आहे. तरीदेखील अनेकांना दुसरा डोस मिळण्यात अडचणी ...

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यासाठी आता ७० हजार लसींचा साठा मिळाला आहे. तरीदेखील अनेकांना दुसरा डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातदेखील दुसरा डोस मिळण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र वेळेवर दुसरा डोस मिळाला नाही तरी फारसे घाबरण्याचे कारण नाही. दुसरा डोस काही दिवस उशिराने घेतला तरी अँटिबॉडी तयार होण्यावर फारसा परिणाम होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
१ मेपासून देशभरात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांना किंवा ज्या आरोग्य, महसूल अथवा इतर कर्मचाऱ्यांनी या आधी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस मिळणे कठीण झाले आहे. पहिला डोस घेतल्यावर योग्य वेळेत दुसरा डोस मिळाला नाही तरी घाबरण्याचे त्यात काहीही कारण नाही. त्याचा अँटिबॉडी बनवण्यावर फार परिणाम होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रिव्हेटिव्ह मेडिसीनच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. योगीता बाविस्कर यांनी सांगितले की, त्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना आलेल्या नसल्या तरी दुसरा डोस वेळेत मिळाला नाही. त्यात घाबरण्याचे कारण नाही. त्यामुळे अँटिबॉडी तयार होण्यावर फार मोठा फरक नक्कीच पडत नाही किंवा पहिल्यापासून लसीकरणाला सुरुवात करावी लागणार नाही.
पहिला डोस झालेले आरोग्यसेवक- २४,५०१
दुसरा डोस झालेले आरोग्यसेवक- १३,६२४
पहिला डोस झालेले फ्रन्टलाइन वर्कर्स- ३०,९०७
दुसरा डोस झालेले फ्रन्टलाइन वर्कर्स -१०,७५३
पहिला डोस झालेले नागरिक- २,०९,१७४
दुसरा डोस झालेले नागरिक- ३७,२४४
दुसऱ्या डोससाठी करावी लागणार प्रतीक्षा
जिल्ह्याला आता ७० हजार डोस मिळाले असले तरी त्यातून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यांचे लसीकरण आधी केले जात आहे. बुधवारी जिल्हाभरात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बहुतेकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.
पहिल्या लसीचे काम ७० ते ८० दिवसांपर्यंत सुरू राहते. त्याची इम्युनिटी कमी असते. थोडा उशीर झाला तर फार फरक पडत नाही. तसेच उशीर झाला तर काय करायचे याबाबत आयसीएमआरच्या गाइडलाइन आलेल्या नाहीत.
- डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक