जळगाव : कोरोनामुळे यंदा कुठल्याही गणेश मंडळामध्ये विसर्जन मिरवणूक राहणार नसून, वाजंत्रीदेखील नसणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळानी निरोपाची आरती मंडपातच करून 'श्री' चे मेहरूण तलावाकडे विसर्जनासाठी प्रस्थान करण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे शहरातील सर्व मंडळांना करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतींच्या विसर्जनाकरिता गणेश घाटावर गर्दी न करता, मनपाने शहरात उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरातील गणेश मंडळांकडे सुपूर्त करण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनामुळे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरही शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व लहान व मोठ्या मंडळाना सकाळी नऊ पासून विसर्जन करण्याचे आवाहन केले असून,रात्री नऊ पर्यंत सर्व मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे नियोजन केले आहे. नेहमी प्रमाणे यंदाही घरगुती गणपती गणेश घाटावर विसर्जित करण्यात येणार असून, मंडळाचे गणपती मेहरूण तलावावर विसर्जित करण्यात येणार आहेत.
इन्फो :
सकाळी नऊपासून विसर्जनला होणार सुरुवात
जळगाव शहरात लहान मंडळानची संख्या ४५० असून, मोठ्या मंडळांची संख्या १०० ते १२५ घरात आहे. यंदा मिरवणूक राहणार नसल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे शहरातील या सर्व लहान-मोठ्या मंडळांना मंडपातच बाप्पाच्या निरोपाची आरती करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर त्या-त्या मंडळांनी सकाळी नऊ पासून मूर्ती विसर्जनाला सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कोरोनामुळे प्रत्येक मंडळांना विसर्जनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे त्यांच्या सोयीचे मार्ग आखून दिले होते, यंदाही त्याच मार्गावरूनच बाप्पाला नेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. तसेच विसर्जनासाठी मोजक्याच कार्यकर्त्यांना नेण्याचे आवाहन केले आहे.
इन्फो :
विसर्जनासाठी २५० गणेश रक्षक नियुक्त
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल असे २५० गणेश रक्षक या विसर्जनाच्या ठिकाणी विसर्जन होईपर्यंत तैनात राहणार आहेत. घरगुती गणपती गणेश घाटावर विसर्जित होणार असल्याने, या ठिकाणी २०० गणेश रक्षक विसर्जनासाठी थांबणार आहेत तर मेहरूण तलावावर ५० गणेशरक्षक नियुक्त राहणार आहेत. मेहरूण तलावावर लहान-मोठ्या मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होणार असून, मदतीसाठी मनपाचे व जिल्हा आपत्ती निवारण विभागाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, अमित भाटिया आदी पदाधिकारी विसर्जन होईपर्यंत या ठिकाणी थांबणार आहेत.
इन्फो :
शहरातील मोठे गणेश मंडळ : १२५
लहान लहान मंडळे : ४५०
विसर्जनासाठी गणेश रक्षक- २५०