डॉक्टरच्या आत्महत्येचा ठपका चौघांवर
By Admin | Updated: November 22, 2015 00:49 IST2015-11-22T00:49:58+5:302015-11-22T00:49:58+5:30
कारकून अटकेत : जि.प.सदस्यासह नगरसेवक आरोपी

डॉक्टरच्या आत्महत्येचा ठपका चौघांवर
जळगाव : पिंपळगाव ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी जि.प. सदस्य संजय पाटील, वरणगाव पालिकेतील भाजपा नगरसेवक बबलू माळी, आरोग्य केंद्रातील लिपिक अविनाश पाटील, या केंद्रातील वाहनचालक सुपडू पाटील या चौघांविरुद्ध शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. अविनाश पाटील याला रात्री साडेआठ वाजता अटक करण्यात आलीे. डॉ.दिनेश पाटील यांचे मेहुणे ईश्वर भागवत पवार (वय 42, रा.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ.पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी डॉ.पाटील यांच्या म्हसास, ता.पाचोरा येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना सायंकाळी घेराव घातला. या वेळी सुपेकर यांनी दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी जिल्हा पेठ पोलिसांना आदेश दिले. पिंपळगाव आरोग्य केंद्रातील लिपिक अविनाश पाटील व चालक सुपडू पाटील यांची चौकशी करण्याचा निर्णय जि.प. प्रशासनाने घेतला. चौकशीसाठी दोन सदस्यांची समिती असेल, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.