वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:24+5:302021-08-19T04:21:24+5:30

जळगाव : वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे किंवा असलेले लायसन्स नूतनीकरण करायचे असेल तर आता एमबीबीएस डॉक्टरांचे ऑनलाइन प्रमाणपत्र ...

Doctor's certificate required to get a driving license after the age of 40! | वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र !

वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र !

जळगाव : वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे किंवा असलेले लायसन्स नूतनीकरण करायचे असेल तर आता एमबीबीएस डॉक्टरांचे ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, त्याशिवाय लायसन्स मिळूच शकणार नाही. आरटीओ कार्यालय आणि लायसन्स हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अलीकडे ऑनलाइन लर्निंग लायसन्समुळे सुटसुटीतपणा आला असला, तरी लायसन्स मिळवण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. तिथे तारीख मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते. आता चाळिशीनंतर एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

वर्षभरात ४३ हजार लर्निंग लायसन्स

गेल्या वर्षभरात ४३ हजार १४० जणांना लर्निंग लायसन्स देण्यात आलेले आहे. त्याआधीच्या वर्षात ७७ हजार ८२६ तर २०१८-१९ मध्ये ५५ हजार ८९३ जणांना लायसन्स देण्यात आले होते. दररोज किमान शंभरच्या वर लायसन्स दिले जातात. कोरोनाकाळात ही संख्या कमी होती. मात्र नंतर त्यात कोटा ठरविण्यात आला. हा कोटादेखील प्रत्येक वेळी निश्चित नसतो, त्यात परिस्थितीनुसार बदल केला जातो. २०१६-१७ या वर्षी तब्बल ८३ हजार ४३५ जणांना लर्निंग लायसन्स देण्यात आले व २०१७-१८ मध्ये ५५ हजार ४७४ लायसन्स देण्यात आले आहे.

किती वयापर्यंत मिळते लायसन्स?

लायसन्स काढायचे असेल तर १८ वर्ष वयापासून ते मिळू शकते. किती वयापर्यंत लायसन्स मिळू शकते याबाबत शासनाचे धोरण किंवा नियम नाही, मात्र डॉक्टरांचे प्रमाणपत्र त्याला आवश्यक आहे. ही व्यक्ती वाहन चालविण्यास सक्षम आहे, असे प्रमाणपत्र डॉक्टरांनी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे वृध्दापकाळातही आपण लायसन्स काढू शकतो. दिव्यांग व्यक्तींसाठीही नियमावली आहे. त्यालादेखील डॉक्टरांचेच प्रमाणपत्र आवश्यक आहे.

डॉक्टरांना मिळणार यूझर आयडी

मोटारवाहन कायदा कलम ८ (३) अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत १३ सप्टेंबर २०१३ च्या आदेशानुसार नमुना क्र. १ (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र हे केवळ एमबीबीएस डॉक्टरच देऊ शकतील असे आदेश आहेत. नवीन नियमानुसार वयाच्या चाळिशीनंतर हे प्रमाणपत्र लागणार आहे. मात्र एक डॉक्टर दिवसाला किती प्रमाणपत्र देऊ शकेल याबाबत अजूनही धोरण निश्चित झालेले नाही. नागरिकांचे कार्य फेसलेस होण्याकरिता एनआयसीद्वारे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन पध्दतीने भरून अपलोड करण्याची प्रक्रिया विकसित करण्यात आली असून, प्रायोगिक तत्त्वावर पिंपरी-चिंचवड येथे प्रणालीची तपासणी केली जात आहे. संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांना लॉग इन करून अर्जदाराची नियमाप्रमाणे आवश्यक शारीरीक तपासणी करून अपलोड करावी लागणार आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील पात्र डॉक्टरांनी बैठक घेऊन त्यांना यूझर आयडी देण्याची कार्यवाही ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी केलेल्या आहेत.

कोट...

वयाच्या चाळिशीनंतर लायसन्स काढायचे असेल तर त्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुचाकी लायसन्स काढता येते. किती वयापर्यंत लायसन्स मिळू शकते याबाबत नियम नाही, मात्र डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक आहे.

-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Doctor's certificate required to get a driving license after the age of 40!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.