पहूर ग्रामीण रुग्णालयास कोणी डॉक्टर देता का डॉक्टर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST2021-08-26T04:18:42+5:302021-08-26T04:18:42+5:30
जळगाव जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणावरील पहूर ग्रामीण रुग्णालय असून, तब्बल पंचवीस खेड्यांचा संपर्क असल्याने रुग्णांची नेहमी वर्दळ याठिकाणी असते. त्यातच ...

पहूर ग्रामीण रुग्णालयास कोणी डॉक्टर देता का डॉक्टर!
जळगाव जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणावरील पहूर ग्रामीण रुग्णालय असून, तब्बल पंचवीस खेड्यांचा संपर्क असल्याने रुग्णांची नेहमी वर्दळ याठिकाणी असते. त्यातच नजीकचा महामार्ग असल्याने छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. मात्र, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अत्यवस्थ रुग्णांवर साधे प्राथमिक उपचार होत नसल्याने काही रुग्णांच्या जिवावर बेतत आहे.
गेल्या आठवड्यातील रविवारी पहूर कसबेतील उमेश खंडू बोरसे (२८) या तरुण शेतकऱ्याला शेतात सर्पदंश झाला. तरुण स्वतः रुग्णालयात येऊन उपचारासाठी याचना करीत होता. मात्र, डॉक्टर नसल्याने तरुणावर प्राथमिक उपचारही होऊ शकला नाही. या तरुणाला तातडीने जळगाव सामान्य रुग्णालयात हलविले गेले. उपचारादरम्यान या तरुणाची प्रकृती गंभीर झाली; पण वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. मागील महिन्यात सर्पदंशाने विनोद फकिरा चौधरी (४८) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याच्या मृत्यूबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. या ठळक घटना असल्या तरी प्रसूती, अपघात, साथीच्या आजारांच्या रुग्णसेवेचा प्रश्न गंभीर आहे. डॉक्टर नसल्याने रुग्णालयात रुग्णांनी पाठ फिरविल्याने रुग्णालयातील खाटा रुग्णांअभावी ओस पडल्याचे भयावह वास्तव आहे. शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे जावे लागते. त्यामुळे जिवंत रुग्णांचा ठप्प रुग्णसेवेमुळे जीव धोक्यात आला आहे, तर मृतदेहांची हेळसांड होत असल्याने प्रशासनाने जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नये अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. रुग्णसेवा ठप्प
वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पाटील व डॉ. परेश जैन यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला. त्यामुळे आठवडाभरापासून रुग्णसेवा ठप्प आहे. शासन फक्त तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी डॉक्टर नियुक्ती देतात. सात ते आठ महिन्यांत संबंधित डॉक्टर चालते होतात. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांच्याकडे पदभार आहे. मात्र, जामनेर उपजिल्हा रुग्णालयातून पहूर येथे रुग्णसेवा देण्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी नवीन डॉक्टर येण्यास अनुकूलता दाखवीत नाही असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी खाजगीत सांगून वेळ मारून नेतात. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही रुग्णालयाला गेल्या वर्षी भेट देऊन रुग्णालयासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा दर्जा आजही कागदावरच आहे.
साथीच्या आजांराचे काय? उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. एकप्रकारे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे हा अधिकार व हक्क घटना पीठाने नागरिकांना दिला आहे. मात्र, पहूरकर याला अपवाद ठरत आहे.
‘लोकमत’चा पाठपुरावा
यासंदर्भात वेळोवेळी ‘लोकमत’ने पाठपुरावा सुरू ठेवला. दि. ४ ऑगस्ट बुधवार रोजी ‘पहूर रुग्णालयास अधिकारी नियुक्तीचा आजार’ या मथळ्याखाली विस्तृत वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले व रुग्णसेवा बंद पडणार असल्याचे प्रशासनाला वेळीच जागृत केले. प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने रुग्णसेवा ठप्प झाली आहे.
-----प्रतिक्रिया
याठिकाणी विद्यमान दोन डाॅक्टरांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला असल्याने रुग्णसेवा बंद झाली. रुग्णसेवा बंद होऊ नये यासाठी वरिष्ठांकडे तोंडी व लिखित स्वरूपात माहिती दिली असून, वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे.
-डॉ. हर्षल चांदा, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, पहूर
कॅप्शन
पहूर रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णालयाकडे रुग्णांनी पाठ फिरविल्याने रुग्णालयातील रिकाम्या खाटा.