यंदा भूजल सर्वेक्षण लवकर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:16+5:302021-09-07T04:21:16+5:30
जळगाव : भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात येणारे भूजल सर्वेक्षणाचे काम यावर्षी लवकर सुरू करावे, तसेच सर्वेक्षण ...

यंदा भूजल सर्वेक्षण लवकर करा
जळगाव : भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात येणारे भूजल सर्वेक्षणाचे काम यावर्षी लवकर सुरू करावे, तसेच सर्वेक्षण करताना चोपडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, यावल व भुसावळ या तालुक्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भूजल विकास यंत्रणेला दिल्या.
जिल्हा दुष्काळ देखरेख समितीची सोमवारी ऑनलाइन बैठक झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत झालेले पर्जन्यमान, धरणातील उपलब्ध साठा, पेरणी झालेले क्षेत्र इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला असला तरी अमळनेर ७१ टक्के व चोपडा तालुक्यात ६२ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणात आठवडाभरात वाढ झाली असून, जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी बैठकीत दिली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक पद्मनाभा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी, भूजल सर्वेक्षण यंत्रणेसह इतर विभागांचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.