दूरच्या देशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 14:54 IST2019-03-03T14:53:56+5:302019-03-03T14:54:21+5:30
जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिल शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. त्यांच्या अनुभवावर आधारित क्रमश: लेखमाला ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत. लेखमालेचा आज पहिला भाग.

दूरच्या देशा
एका कामासाठी मला बांगला देशात जाण्याची गरज होती आणि त्यात अतिशय अवघड आणि थोडा जोखमीचा प्रवास होता. तरी प्रवासाची संधी होती आणि मी ती घेतली. तेथे बोली आणि सरकारी कामाचीही भाषा बंगाली हीच. बंगाली उच्चारांची गंमत मला तेथे पदोपदी त्रास देत राहिली. समोरचा इंग्रजी बोलला तरी एकेक शब्द दोन दोन वेळा ‘आॅऽऽऽ’ किंवा ‘सॉरीऽऽ’ करत करत विचारूनच पुढे जावे लागायचे. सोबतच्या मोबाइलवर इंटरनेटची मदतही त्यासाठी वारंवार घेत होतो. काही लोक हिंदी बोलतात, पण तसे मला कमीच भेटले.
पारपत्र, व्हिसा आणि ओळखपत्र यांचे महत्त्व कधी नव्हे इतके सगळीकडेच वाढले आहे. पृथ्वीवर माणसांनी निर्माण केलेल्या सीमांची कुंपणे माणसांच्याच जीवावर उठली आहेत. त्यासाठी मला बांगला देशातील लोकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून निमंत्रणपत्र मागवावे लागले. ते व्हिसाच्या अर्जासह जोडले तेव्हा व्हिसा मिळाला. बांगला देशचा व्हिसा आता सहज मिळत नाही.
कोणत्याही देशात गेल्यावर तेथे संपर्काचे साधन म्हणून आता मोबाइल अनिवार्यच झाला आहे. कोणत्या कंपनीची ‘रेंज’ सर्वत्र चांगली मिळते हे माहीत करून घेतले होते. त्या देशात सीमकार्ड घेणे सोपे आहे असे कळले होते. तरीही मी विमानतळावरच सीमकार्डचे दुकान शोधले. ते घेतले आणि बचावलो. कारण मी थांबलो त्याच हॉटेलमध्ये नंतर आलेल्या एका प्रवाशाने तुम्हाला सीमकार्ड कसे काय मिळाले, असे मला विचारता मी ते विमानतळावरच घेतल्याचा खुलासा केला. त्याला का मिळाले नाही विचारता, तो पाच-सहा वेळा आला तेव्हा त्याला गावात सहज मिळाले होते, असा अनुभव सांगितला. मात्र या खेपेला विमानतळाबाहेर आल्यावर त्याला ढाक्का सोडेपर्यंत खूप प्रयत्न करूनही सीमकार्ड मिळालेच नाही. कारण विचारता त्या देशाने नागरिकांना दिलेले तेथले स्थानिक ओळखपत्र असल्याशिवाय आता सीमकार्ड मिळत नाही, असा खुलासा मला दिला. पासपोर्टचा उपयोग शून्य. एकदा का तुम्ही विमानतळाबाहेर आलात की मग स्थानिक ओळखपत्राशिवाय सीमकार्ड नाहीच.
अतिरेक्यांनी सगळ्याच देशात उच्छाद मांडून प्रत्येकाच्याच मनात प्रचंड मोठी आणि न ओलांडता येणारी असुरक्षिततेची कडेकोट भिंत उभी करून ठेवली आहे. शिवाय माणसे त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. त्याचा हा परिणाम. वसुधैव कुटुंबकम किंवा सभै भूमी गोपालकी या अतिशय खोल भारतीय तत्त्वज्ञानाच्या कधीच चिंध्या झाल्या आहेत. गावात फिरतानाही पारपत्र आणि व्हिसा सतत सोबत ठेवला पाहिजे. कुणा एका माणसाने सगळ्या देशात मला मुक्त फिरता आले पाहिजे आणि व्हिसाची गरज नसावी असे प्रश्न विचारत, आहे त्या व्यवस्थेला क्षीण आवाजात का असेना पण प्रश्न विचारले आणि तसा प्रवास करायचा प्रयत्न केला. पण भिंती निर्माण करणारी व्यवस्था अधिक बलदंड ठरली.
मला जायचे होते ते ठिकाण रंगबली (बंऊ. रोंगबॉली) पतुआखलि जिल्ह्यात. रंगबली हे एका बेटावर आहे. त्याच्या चारही बाजूंना पाणी आहे. जवळ वस्ती कमीतकमी ४५ किलोमीटर अंतरावर आणि तीही वाट पाण्यातूनच. हे ठिकाण आहे बांगला देशाच्या दक्षिण टोकाला. अगदी बंगालच्या उपसागराच्या तोंडाशी. या भागात नेहमी चक्रीवादळे येऊन धडकतात. येथे जमिनीचा आकार नरसाळ्यासारखा निमुळता असल्याने समुद्रातून वादळाचा वेग आता जमिनीकडे येताना प्रचंड वाढतो आणि खूप नुकसान करतो. भौगोलिक दृष्ट्या अतिशय चक्रीवादळ प्रवण. (क्रमश:)
-अनिल शाह, जळगाव