खराब रस्त्यांमुळे चाळीसगावात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST2021-08-26T04:18:50+5:302021-08-26T04:18:50+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. याच रस्त्यावरून सोलापूर-धुळे जाणाऱ्या महामार्गावरील हजारो वाहने धावतात. रस्त्यावर डांबर तर दिसतच नाही. ...

Dissatisfaction in Chalisgaon due to bad roads | खराब रस्त्यांमुळे चाळीसगावात असंतोष

खराब रस्त्यांमुळे चाळीसगावात असंतोष

शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. याच रस्त्यावरून सोलापूर-धुळे जाणाऱ्या महामार्गावरील हजारो वाहने धावतात. रस्त्यावर डांबर तर दिसतच नाही. ठिकठिकाणी हा रस्ता आपल्या अस्तित्वाशी झुंज देत आहे. त्यामुळे हा रस्ता खेडेगावाला जोडणारा रस्ता आहे काय? असे कुतूहलाने बोलून टिंगल टवाळी सोशल मीडियावर केली जात होती. बडोदा बँकेसमोर रस्त्यावरील खड्ड्यामुळे दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार व त्याची पत्नी मुलासह या खड्ड्यात पडले. सुदैवाने ते बचावले. हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे की काय? असा प्रश्न सर्वांना सतावतो आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी चांगले रस्ते फोडून खड्डे तयार करून ठेवले आहेत. रस्त्याचे काम झाल्यानंतर हे खड्डे बुजविण्याचे कामही करू शकले नाहीत. तर काही ठिकाणी खणलेले खड्डे बुजविले गेले, मात्र काम झाल्यानंतर तो रस्ता योग्य प्रकारे पूर्ववत करण्यात आला नसल्यात्या अनेकांच्या तक्रारी आहेत. हे खड्डे बुजवताना रस्त्यावर माती, छोटे-मोठे दगड पडलेले दिसून येत आहेत. त्यातच आता पाऊस सुरू झाल्याने आणखी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरील खड्डे व धुळीमुळे अनेक वाहनधारकांच्या हाडांचा व श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. वेळीच किमान रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

दरम्यान, गेल्या महिन्यातच खासदार उन्मेश पाटील यांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्यात सत्ताधारी व विरोधी गटातील प्रमुखांशी चर्चा करून शहरातील पाच मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करून या रस्त्याच्या मार्ग मोकळा केला होता. परंतु याकडे सत्ताधारी गटाने कुठलीही हालचाल केलेली दिसून आली नाही म्हणून सत्ताधारी गट यात उघडे पडले.

त्यामुळे शहर व तालुक्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या रस्त्यामुळे सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधी गटाकडून गेल्या महिन्यापूर्वी रस्त्यावर झाडे लावून आंदोलन केले होते. त्यानंतर ढोल बजाव आंदोलन दोन दिवसांपूर्वी करण्यात आले. रयत सेनेतर्फे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. त्यानंतर लगेच मोरसिंग राठोड मित्र मंडळातर्फे स्वखर्चाने या रस्त्यावर मुरूम, खडी टाकण्यात आल्याने रस्त्याची तात्पुरती डागडुजी झाली.

---

संजय सोनार

Web Title: Dissatisfaction in Chalisgaon due to bad roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.