मेहुणबारे, ता.चाळीसगाव : मंदिराच्या बांधकामासाठी वाळू लागत असल्याची बतावणी करीत माफियांनी वाळू वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. याला वरखेडे खुर्द येथील ग्रामस्थांनी विरोध करीत जेसीबी, ट्रॅक्टर रोखून धरले. यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
वरखेडे खुर्द येथील गिरणा पात्रात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काही लोक जेसीबी मशीन व सात ते आठ ट्रॅक्टरसह येथे गिरणा नदीपात्रात वाळू उत्खननासाठी आले. हा प्रकार वरखेडे ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या वाळू घेण्यास विरोध केला आणि जेसीबी व ट्रॅक्टर रोखून धरले. त्यावेळी वाळूमाफियांनी ही वाळू मंदिराच्या कामासाठी लागत असून विरोध करू नका... आम्ही यंत्रणेला सांभाळून घेऊ.. तुम्ही फक्त वाळू उपसा व वाहतुकीला परवानगी द्या असे सांगितले. यावर वाळूमाफियांनी सात ते आठ ट्रॅक्टरसह जेसीबी मशीन आणले. त्यामुळे ग्रामस्थ संतापले. त्यामुळे वाळू नेण्यासाठी आलेले व वरखेडे ग्रामस्थांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण
झाला. वाळू चोरी करण्यासाठी आलेले संबंधित धमक्याही देत होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासकीय यंत्रणेला कळवून देखील कुणीच वेळेवर पोहोचले नाही. शेवटी वाळू वाहतूक करून माफियांनी पोबारा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.