जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीत सुधारणा हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST2021-04-14T04:15:34+5:302021-04-14T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन सदस्यीय केंद्रीय समितीने गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. ...

जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीत सुधारणा हवी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन सदस्यीय केंद्रीय समितीने गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यात सर्व पाहणी केल्यानंतर एकत्रित मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा मार्गी लावावा व जैविक कचऱ्याची जी विल्हेवाट लावली जाते, त्यात सुधारणा करावी, अशा दोन महत्त्वाच्या सूचना या समितीने प्रशासनाला केल्या आहेत, अन्य सर्व बाबी या निकषानुसार असल्याचे समितीने नोंदविले आहे.
जोधपूर येथील डॉ.श्रीकांत व भुवनेश्वर येथील डॉ.अनुपमा बेहरे यांचा या केंद्रीय समितीत सहभाग होता. या समितीने ८ एप्रिलपासून विविध ठिकाणी भेटी देऊन संपूर्ण माहिती, आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे कार्यरत आहे ही माहिती जाणून घेतली. यात समितीच्या सदस्यांनी त्यांनी आणलेल्या फॅारमॅटमध्ये या सर्व नोंदी घेतल्या आहेत. समिती हा एकत्रित अहवाल केंद्राकडे सुपूर्द करणार आहे. समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भुसावळ, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय विविध ठिकाणी पाहणी केली. समितीने जीएमसीत दोन तास पाहणी करून रुग्णांकडून सर्व माहिती घेतली होती. समितीच्या सदस्य डॉ. अनुपमा बेहरे यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोरील टेलिमेडिसीनच्या कार्यालयातून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांच्यासोबत संपूर्ण माहिती घेत अहवाल तयार केला.
स्थानिक पातळीवर समितीने जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत सुधारणा करण्याबाबतचे सुचिवले आहे. जिल्ह्यात हाच मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार गंभीरतेने समोर येत आहे. नुकतेच वापरलेल्या मास्कचा चक्क गाद्यांमध्ये वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. काही खासगी रुग्णालये हा कचरा रस्त्यावर जाळत असल्याचेही मध्यंतरी समोर आले होते.