पिंप्राळ्यातील जीर्ण रथ पंचमहाभूतांना समर्पित
By अमित महाबळ | Updated: September 27, 2022 15:31 IST2022-09-27T15:29:03+5:302022-09-27T15:31:07+5:30
जळगाव शहराचा भाग असलेले पिंप्राळा हे पूर्वी स्वतंत्र गाव होते. त्याची स्वत:ची ग्रामपंचायत होती. गावाच्या शेवटच्या भागात पुरातन विठ्ठल मंदिर आहे. मंदिर दोन मजली असून, बांधकाम लाकडात केलेले आहे.

पिंप्राळ्यातील जीर्ण रथ पंचमहाभूतांना समर्पित
जळगाव : पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानचा जीर्ण झालेला रथ मंगळवारी, पंचमहाभूतांना समर्पित करण्यात आला. त्याचे अग्निमध्ये विधिवत हवन करण्यात आले. जानकीबाई यांचे माहेर असलेल्या गांधी चौकात हा सोहळा सर्वांच्या साक्षीने पार पडला.
जळगाव शहराचा भाग असलेले पिंप्राळा हे पूर्वी स्वतंत्र गाव होते. त्याची स्वत:ची ग्रामपंचायत होती. गावाच्या शेवटच्या भागात पुरातन विठ्ठल मंदिर आहे. मंदिर दोन मजली असून, बांधकाम लाकडात केलेले आहे. विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असलेले हे राज्यातील एकमेव मंदिर असल्याचे म्हटले जाते. श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी आषाढी एकादशीला रथोत्सव साजरा केला जातो. त्याचे यंदा १४७ वे वर्ष होते.
या रथोत्सवासाठी तोताराम नत्थूशेठ वाणी यांनी कन्या जानकाबाई हिच्या स्मरणार्थ मोठा रथ श्री विठ्ठल मंदिर संस्थानला अर्पण केला होता. बरीच वर्षे तो वापरला गेला. त्यानंतर २००१ मध्ये नवीन तयार केलेला रथ उत्सवासाठी वापरला जाऊ लागला. नवीन रथासाठी स्वतंत्र घर बांधले आहे, त्या शेजारीच आधीचा रथ ठेवलेला होता.
यांच्या बैठकीत निर्णय
जीर्ण झालेल्या रथाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात वाणी समाज बांधव, श्री विठ्ठल मंदिराचे पुजारी, कार्यकारिणी सदस्य, समस्त पांडुरंग भजनी मंडळ, सत्संग मंडळ, शांतता कमिटी सदस्य, नगरसेवक, ग्रामस्थ यांची बैठक झाली. श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी यांनी जुन्या रथाचे विसर्जन करण्याचा प्रस्ताव मांडला. रथोत्सव समितीचे प्रमुख अनिल वाणी यांनी जीर्ण झालेल्या रथाची पार्श्वभूमी सभेत मांडली. त्यानंतर हा रथ पंचमहाभूतांना समर्पित करण्याचे ठरले.
असा झाला विधी
जीर्ण झालेल्या रथाची अनिल व आरती वाणी, किशोर व जयश्री वाणी, संजय व सुवर्णा वाणी, पुरुषोत्तम व शांताबाई सोमाणी, जितेंद्र व गौरी पाटील या जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पौराहित्य मनोज कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सारंग कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर जीर्ण रथ अग्निला समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाला वाणी मंच मंडळाचे अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष सुनील वाणी, चिटणीस योगेश वाणी, सहसिचटणीस नंदकिशोर वाणी, सदस्य रुपेश वाणी, अक्षय वाणी, कल्पेश वाणी, प्रवीण वाणी, संजय वाणी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तापी नदीत होणार रक्षा विसर्जन
रथाच्या रक्षेची भजनी मंडळासमवेत रविवारी, गाव प्रदक्षिणा केली जाणार आहे. सुरुवात गांधी चौकापासून, तर समारोप सोमाणी मार्केट चौकात होईल. त्यानंतर रक्षेचे विसर्जन तापी नदीत (मुक्ताईनगर) केले जाणार आहे. जीर्ण झालेल्या रथावरील ताम्रपट हा नवीन रथाला लावण्यात येणार आहे.