बसस्थानकातील हिरकणी कक्ष बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:43+5:302021-01-08T04:46:43+5:30
जळगाव : एसटी महामंडळाच्या जळगाव बसस्थानकात महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी तयार करण्यात आलेला कक्ष सोमवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या ...

बसस्थानकातील हिरकणी कक्ष बंदच
जळगाव : एसटी महामंडळाच्या जळगाव बसस्थानकात महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी तयार करण्यात आलेला कक्ष सोमवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत बंद दिसून आला. यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.
स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जळगाव बसस्थानकावर हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात महिलांना बसण्यासाठी खुर्ची व छतावरील पंखाही बसविण्यात आला आहे. सुरुवातीला हा कक्ष उघडल्यानंतर महिला या कक्षाचा लाभही घेत होत्या. मात्र, आगार प्रशासनातर्फे या कक्षात नियमित स्वच्छता ना लाइटची व्यवस्था नसल्यामुळे महिलांनी या कक्षाकडे पाठ फिरविली आहे. विशेष म्हणजे हा कक्ष नेहमी बंदच राहत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे स्तनदा मातांची प्रवासादरम्यान आपल्या बाळाला स्तनपान करताना कुचंबणा होत आहे.
इन्फो :
अनेक महिन्यांपासून कक्ष बंदच
येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, साधारणत: पाच वर्षांपूर्वी हा कक्ष उघडण्यात आला होता. मात्र, आगार प्रशासनातर्फे या कक्षाबद्दल महिलांमध्ये जनजागृती नसल्याने, महिलांचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून बंदच असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
फलक नसल्यामुळे, महिलांना कल्पनाच नाही
आगार प्रशासनातर्फे स्थानकात बाहेरून आलिशान दिसणारा, असा कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी हिरकणी कक्ष असल्याबाबत कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही. तसेच ध्वनिक्षेपणाद्वारेही कुठलीही जनजागृती होत नसल्यामुळे, बहुतांश महिला प्रवाशांना या कक्षाबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे.
इन्फो :
आगारातील हिरकणी कक्ष बंद नसून, दरवाजा लावलेला असतो. महिला दरवाजा उघडून बाळांना स्तनपान करीत असतात. तसेच कक्षामध्ये सर्व सुविधा आहेत.
- प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार