निरोगी समाजनिर्मितीसाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस अभियानाची सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:26 IST2019-01-21T01:24:38+5:302019-01-21T01:26:06+5:30
निरोगी समाजनिर्मिती स्वप्न साकार करण्यासाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस या अभियानाची सुरवात केली आहे. सदर अभियान हे जागतिक पातळीवर असून, महाराष्ट्रातून व मराठी माणसाकडून याची सुरवात होत आहे. याचा मला महाराष्ट्रीयन म्हणून रास्त अभिमान आहे, असे विचार महाराष्ट्र शासनाचे आरोग्यदूत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले.

निरोगी समाजनिर्मितीसाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस अभियानाची सुरवात
भडगाव, जि.जळगाव : निरोगी समाजनिर्मिती स्वप्न साकार करण्यासाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस या अभियानाची सुरवात केली आहे. सदर अभियान हे जागतिक पातळीवर असून, महाराष्ट्रातून व मराठी माणसाकडून याची सुरवात होत आहे. याचा मला महाराष्ट्रीयन म्हणून रास्त अभिमान आहे, असे विचार महाराष्ट्र शासनाचे आरोग्यदूत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनीच्या चौदाव्या वर्षाचे पहिले पुष्प गुंफताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील होते. व्यासपीठावर ग.स.बँकेचे चेअरमन विलास नेरकर, पोलीस निरीक्षक धनंजय वेरुळे, योगेश सोनजे इ. मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
निरोगी व सुदृढ राहण्यासाठी दोनच ठरावीक वेळेत ५५ मिनिटात भोजन घ्यावे. मधल्या काळात खाण्यासाठी तोंड बंद ठेवावे. इंग्रजांनी आपल्याला चहाचे व्यसन लावले आहे. त्याऐवजी ग्रीन टी, ब्लॅक टी, आरोग्यास उपयुक्त आहे. जेवण करताना काय काळजी घ्यावी, कोणते पदार्थ अगोदर खावे येथपासून तर आपण खात असलेल्या अन्नाचे कशाप्रकारे शरीरात विघटन होते व मधुमेहाला सुरवात कशापासून होते याबाबत आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात डॉ.दीक्षित यांनी टीप्स दिल्या. तसेच लठ्ठपणा व मधुमेहापासून मुक्ती मिळवायाची असेल तर आपणास आपल्या आहार व विहारावर नियंत्रण ठेवावे. सुरवातीस या सवयी लागण्यासाठी आपणास त्रास होईल, परंतु नंतर आपण्यास त्याचा लाभ होईल, म्हणून आपली जीवनशैली बदलवून आपण आपले आरोग्य उत्तम आपणच राखू शकतो. यासाठी कोणतेही औषधोपचार होण्याची गरज नाही, असे आग्रही प्रतिपादन डॉ.दीक्षित यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते केशवसूत व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रथम पुष्प आमदार किशोर पाटील यांनी आपल्या पिताश्री धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रायोजित केले होते. पुढील रौप्य महोत्सवी वर्षासाठी विनय जकातदार व डॉ.शांतीलाल तोतला यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. व्याख्यानास श्रोत्यांची प्रचंड उपस्थिती होती. प्रास्ताविक केशवसूत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विनयराव देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन सचिव प्रा.दीपक मराठे यांनी केले.