धरणगाव बसस्थानक वर्षभरापासून तहानलेले, तर स्वच्छतेचे तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:51 IST2020-12-19T14:51:42+5:302020-12-19T14:51:42+5:30
बसस्थानकात गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना प्यायला पाणीच नाही. एवढेच नव्हे तर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.

धरणगाव बसस्थानक वर्षभरापासून तहानलेले, तर स्वच्छतेचे तीन तेरा
धरणगाव : धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सर्वात मोठे व तालुक्याचे गाव म्हणून हे गाव ओळखले जाते. तालुक्याच्या बसस्थानकात गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना प्यायला पाणीच नाही. एवढेच नव्हे तर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.
याठिकाणी नवीन बसस्थानक व पाण्याची टाकी गेल्या वर्षभरापूर्वी बांधण्यात आली. या कामास आजच्या स्थितीत जवळपास एक वर्ष पूर्ण होण्यात येत आहे. तरीदेखील बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यासंदर्भात धरणगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पत्रव्यवहार करूनदेखील त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
तसेच बसस्थानकात साफसफाईसाठी ठेका देण्यात आला होता. यात स्वच्छतागृह सफाई कामगार साफसफाई करीत होता. मात्र सध्या बसस्थानक कुणीही सफाई करीत नाही. याठिकाणी कोरोनानंतरच्या कालावधीत बस सुरू झाल्यापासून स्वच्छतादेखील केली जात नाही. तसेच बसस्थानकात मातीचे ढिगारे व सर्वदूर अस्वच्छता असे चित्र निर्माण झाले आहे.
याठिकाणी असलेली पाण्याची टाकी लवकरच कार्यान्वित केली जाईल, अशी अपेक्षा प्रवासी वर्ग करीत आहेत.