शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला; डंपर-क्रुज़रच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी
By Ajay.patil | Published: March 15, 2024 11:22 AM2024-03-15T11:22:02+5:302024-03-15T11:22:44+5:30
जळगावच्या खोटे नगर परिसरात शोककळा, बांभोरी बसस्टॉपवरील भीषण घटना
जळगाव : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर जवळ बकावा येथे प्राणप्रतिष्ठाकरिता शिवलिंग घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर कारला वाळूच्या भरधाव डंपरने धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. जळगावातून घरापासून निघून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या बांभोरीजवळ हा अपघात झाला आहे.
विजय हिम्मत चौधरी (वय् ४०, साई नगर), तुषार वासुदेव जाधव (वय् २८, रा. खोटे नगर) व भूषण सुभाष खंबायत (३५, रा.साई नगर ) यांचा मृत झालेल्यांत समावेश आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप साळुंखे, के. डी. पाटील, अनिल ठाकरे, बापू पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी -
घटनेत मयत झालेला भूषण खंबायत याचे साईनगर येथे समृद्धी प्रोव्हिजन आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. तर विजय चौधरी हे शेरी ता. धरणगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक असून त्यांच्या पश्चात आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. तुषार जाधव हा ड्रायव्हर असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान मयत झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकाच आक्रोश केला होता.