सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीमुळेच शहराच्या विकासाला ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:10+5:302021-08-19T04:21:10+5:30
जळगाव - शहरातील विकासाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात भाजपची सत्ता असल्याने जळगावकरांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत ...

सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीमुळेच शहराच्या विकासाला ग्रहण
जळगाव - शहरातील विकासाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात भाजपची सत्ता असल्याने जळगावकरांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत देत सत्ता दिली. राज्यातील सत्तेचा फायदा घेऊन मनपातील सत्ताधारी जळगाव शहराच्या थांबलेल्या विकासाला गती देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अडीच वर्षांतच ती अपेक्षा फोल ठरली. आता राज्यात सेनेची, तर मनपातही सेनेची सत्ता आहे. मात्र, मनपातील सत्ताधाऱ्यांमधील असलेल्या गटबाजीमुळे या सत्तेचा फायदा शहराच्या विकासासाठी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश येत असल्याचेच पाहायला मिळत आहे.
महापालिकेत भाजपला अडीच वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता आल्याने व अंतर्गत बंडाळीने खिळखिळी झालेली भाजपची सत्ता अवघ्या अडीच वर्षांत गेली. भाजप बंडखोरांच्या जोरावर सत्तेत आलेल्या शिवसेनेकडूनदेखील जळगावकरांना अपेक्षा होत्या. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शहराच्या विकासाचा बॅकलॉक भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांचा कार्यकाळातच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी व आपापसातील ‘इगो’च्या समस्येमुळे शहराचा विकासाला ‘ब्रेक’ लावण्याची एकप्रकारे चढाओढ सेनेतच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१०० कोटींसाठी पाठपुराव्याचा अभाव
शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांवरील स्थगिती उठविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून ही स्थगिती आणण्यात आली आहे. नगरविकास मंत्रालय हे सेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. महापालिकेतील सत्तांतरांमध्ये एकनाथ शिंदे यांचीच महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, असे असतानाही १०० कोटींच्या निधीवरील स्थगिती उठविली जात नाही. दुसरीकडे मनपातील सत्तांतरात विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारीदेखील महापालिकेतील कामांबाबत फारसे आग्रही दिसून येत नसल्याने १०० कोटींच्या निधीसाठी फारसा पाठपुरावा होताना दिसून येत नाही.
जे भाजपत झाले तेच शिवसेनेत होतेय?
भाजपने मनपा निवडणुकीच्या तोंडावर काही इतर पक्षांतील नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेतले. मनपात तब्बल ५७ जागा घेऊन भाजपने सत्ता आणली. मात्र, ५७ नगरसेवकांच्या बहुमतात अनेक गट-तट पडल्याने अडीच वर्षांत भाजपला विकासकामांचे नियोजन करता आले नाही. त्यात अडीच वर्षांतच बंडखोरीमुळे सत्ता गमवावी लागली. आता शिवसेनेकडे मनपातील बहुमत आले आहे. मात्र, जी भाजपची स्थिती होती तीच स्थिती आज शिवसेनेची झाली असून, अनेक गट-तट झाले आहेत. यासह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तवदेखील जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकाने दिलेले काम दुसऱ्याकडून थांबविले जात आहे. यामुळेच शहराच्या विकासाचा थांबलेला गाडा अधिक फसत जात असल्याचेच पाहायला मिळत आहे.