लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनानंतर आता पावसाने वेग धरला असून, त्यामुळे अन्य साथींच्या आजारांनी डोके वर काढले. त्या डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शासकीय आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या दहाच दिवसांमध्ये ४४ संशयितांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयातील संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. शासकीय आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये ६१ संशियतांपैकी १० रुग्णांचे नमुने बाधित आढळून आले होते, तर सप्टेंबरमध्ये ४१ नमुने पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, या भागांमध्येही आता साथीच्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने आधीच उपाययोजना हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात दुर्लक्ष
डेंग्यू उपाययोजनांकडे शहरात दुर्लक्ष होत असल्याने भाजपाने याबाबत नुकतेच महापालिकेत धूळफवारणी करून आंदोलन केले. विविध भागांमध्ये डेंग्यूला कारणीभूत डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिवाय अनेक भागांत या अळ्या आढळून आल्या आहेत. अशा स्थितीत विविध भागांत नियमित फवारणीची मागणी होत आहे.
गुळवेल अधिक प्रभावी
- आयुर्वेदच्या डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण कमी होत असते. यात ताप येणे, डोकेदुखी, अंगावर पुरळ, अशी मुख्य लक्षणे असतात. अशा स्थितीत आयुर्वेदात ज्वर कमी करण्यासाठी गुळवेल हे अत्यंत प्रभावी औषध असल्याचे व ते सहजासहजी उपलब्ध होत असल्याचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. गुळवेलचा रस किंवा त्याचे चूर्ण सहज बाजारात उपलब्ध असते.
- लहान मुलांना डेंग्यू प्रतिबंध म्हणून चॉकलेटपेक्षा आवळा, आवळ्याचा मुरब्बा खायला द्यावा, यात व्हिटॅमिन सी व शरीराला मजबूत करणारे अनेक घटक असतात. डेंग्यू झाल्यानंतर गुळवेलचा वापर खूप फायदेशीर ठरतो. शिवाय याचे कसलेली साइड इफेक्ट नसतात. डेंग्यूमध्ये आहाराची विशेष काळजी घ्यावी. रुग्णाची पचनक्षमता कमी झाल्याने त्याला भूक लागल्यावरच थोडे-थोडे खायला द्यावे, यात सुरुवातीला डाळ किंवा भाताचे पाणी द्यावे व नंतर भूक व पचनक्षमता वाढल्यानंतर नियमित जेवण द्यावे, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.