लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्रातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात रविवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.
पुणे शहरातील १४ वर्षीय मुलीवर पुण्यातील १३ नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत घडली. मुंबईतील साकीनाका येथेही तीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे निदर्शने करण्यात आली. महिला अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक पध्दतीने चालवावेत व महिला अत्याचाराशी संबंधित एक स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणावा व महिला अत्याचाराशी संबंधित तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या निदर्शनात अभाविपचे महानगर मंत्री रितेश महाजन, आकाश पाटील, चैतन्य बोरसे, सौरभ भोई, मनीष चव्हाण, शिवा ठाकूर, हिमानी वाडीकर, संकेत वारूळकर, नितेश चौधरी, निखिल राजपूत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.