चाळीसगावच्या मल्हारगडावरील शिल्पाची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:13+5:302021-07-02T04:12:13+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या मल्हारगडाला उपजतच नैसर्गिक लावण्याचे कोंदण आहे. तथापि, वनविभागाच्या अनास्थेमुळे हे ठिकाण अडगळीत पडल्यासारखे झाले ...

चाळीसगावच्या मल्हारगडावरील शिल्पाची मोडतोड
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या मल्हारगडाला उपजतच नैसर्गिक लावण्याचे कोंदण आहे. तथापि, वनविभागाच्या अनास्थेमुळे हे ठिकाण अडगळीत पडल्यासारखे झाले होते. दुर्ग क्षेत्रात काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानने गेल्यावर्षी दिलीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली डागडुजीची मोहीम हाती घेतली. यात गडावर जाण्यासाठी वनविभागाच्या साथीने श्रमदानातून रस्ता साकारला गेला. गडावर वनविभागाच्या पुढाकाराने सुशोभीकरणही केले गेले. यासाठी सातत्याने सह्याद्री प्रतिष्ठानने पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
चौकट
विकृत कृती, शिल्पांची नासधूस
कुणीतरी अज्ञाताने विकृत पद्धतीने येथे बसविण्यात आलेल्या सुंदर शिल्पांची नासधूस केली आहे. पक्षी, पुतळे आदी शिल्पांची नासधूस करण्यात आली आहे. येथे बसविण्यात आलेले बाकही तोडले असल्याचे आढळून आले आहे. यामुळे दुर्ग व पर्यटनप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नासधूस करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणी तीव्र झाली आहे. सोशल माध्यमावरही याविषयी तीव्र निषेध व्यक्त झाला आहे.
इन्फो
तिसऱ्यांदा झाली नासधूस
मल्हार गडाचे सुशोभिकरण केल्यानंतर गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा नासधूस झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिल्यांदा येथे बसविलेले हरणाचे शिल्प तोडले गेले. दुसऱ्यांदा बसण्यासाठीच्या बाकांची तोडफोड झाली. गुरुवारी मोराच्या शिल्पांची नासधूस झाली आहे. आता याठिकाणी मावळ्यांचे पुतळे आहेत. त्यांचे तरी किमान रक्षण करावे. चाळीसगाव पोलिसांत अज्ञातांविरुद्ध तक्रार दिली आहे. आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करीत आहोत.
-दिलीप घोरपडे,
अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगाव.