निंभोरा बुद्रुक, ता. रावेर : येथून जवळच मांगलवाडी येथील ३५० घरांचे संपादन व पुनर्वसन भूसंपादन करावे, अशी मागणी सर्व शक्ती सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा दिले आहे.
तापी नदीकाठावरील मांगलवाडी येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाची नियामक मंडळाची बैठक क्र. ५० मध्ये ठराव क्र. ५०.७ मध्ये ऊर्ध्व तापी टप्पा-१ (हतनूर) प्रकल्पांतर्गत मांगलवाडी येथील ३५० घरांचे संपादन व पुनर्वसन मान्य आहे. हा खर्च जलसंपदा विभागामार्फत करण्याकरिता सदरचे हमीपत्र असूनसुद्धा याची दखल घेतली जात नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मंत्र्यांकडेही वेळोवेळी अर्जाद्वारे व तोंडी प्रत्यक्ष भेटून व्यथा मांडली आहे. गाव तिन्ही बाजूंनी बाराही महिने पाण्याने वेढलेले असते. नदीला पुराचे पाणी वाढल्यास, पावसाची झडी लागल्यास गावाची संपूर्ण जमीन ओलसर राहते. घरांमध्ये सर्दावा (ओलावा) वाढून भिंतींना मिठासारखे पांढरे द्रव्य (लोणी) लागते. घरातील फरशीवर घर पाझरल्यासारखे पाण्याचे थेंब येतात. अनेकांना उंचावर झोपावे लागते. पुराचे पाणी जास्त दिवस राहिल्यास वा यावेळी भूकंपाने जमीन हलल्यास गाव जमिनीखाली जाण्याचा मोठा धोका आहे. गावाच्या आजूबाजूला पाणी असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांपासून अनेकदा धोका निर्माण होतो, पुनर्वसनाच्या यादीत नाव असूनही शासनाकडून गावाला डावलले जात असल्याने गावाचे पुनर्वसनाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा सावळे यांच्यासह मांगलवाडी ग्रामस्थांनी राज्यपालांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. मागणी एक महिन्यात पूर्ण न झाल्यास सर्व शक्ती सेना आंदोलन करेल, असे संघटनेने म्हटले आहे.