श्रीराम मंदिरात आजपासून भागवत सप्ताह
जळगाव : ग्रामदैवत मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रौष्ठपदीनिमित्त १४ सप्टेंबरपासून ते भाद्रपद पौर्णिमेपर्यंत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात रोज सकाळी ८ ते ११ या वेळेत श्रीमद् भागवत संस्कृत संहिता पठण होणार असून, दुपारी ३ ते ६ या वेळेत श्रीमद्भागवत मराठी भावार्थ कथना सेवा होणार आहे. याचे निरूपण ह.भ.प. श्रीराम जोशी हे करणार आहेत. तसेच अप्पा महाराज समाधीतही मुकुंद काका धर्माधिकारी हे भागवत कथेचे वाचन करणार आहेत. अशी माहिती संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. मंगेश महाराज यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा सप्ताह होणार असून, नागरिकांनी घरी बसूनच नाम स्मरण करण्याचे आवाहनही मंगेश महाराज यांनी केले आहे.
जुन्या बस स्थानकासमोर वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकाबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे रस्त्यावरून वापर करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमणावर कारवाई मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना समज
जळगाव : रेल्वे रूळ ओलांडणे गुन्हा आहे, याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे सोमवारी रेल्वे पोलिसांतर्फे रूळ ओलांडून स्टेशनाच्या बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना समज देण्यात आली. तसेच या पुढे असे प्रकार दिसल्यावर, दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : ट्रिपल सीट दुचाकी वाहन चालविणे मनाई असतानाही, शहरात अनेक रस्त्यांवर तरुण मुले ट्रिपल सीट दुचाकी वाहन चालविताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच ही मुले वाहन चालवीत असून, यामुळे अपघाताचे प्रकारही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्रीपल सीट वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.