ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, लॅपटॉपला मागणी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:05+5:302021-07-02T04:12:05+5:30
मागील वर्षी जून ते सप्टेंबर आणि दसरा-दिवाळी काळात मोबाईल, लॅपटॉप खरेदीसाठी ग्राहकांची धूम होती. लॉकडाऊनच्या काळात विदेशी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची ...

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, लॅपटॉपला मागणी कायम
मागील वर्षी जून ते सप्टेंबर आणि दसरा-दिवाळी काळात मोबाईल, लॅपटॉप खरेदीसाठी ग्राहकांची धूम होती. लॉकडाऊनच्या काळात विदेशी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत ऑनलाईन पोहोचत नव्हती. त्यामुळे ग्राहक दुकानांकडे वळले होते. यंदा ऑनलाईनची सुविधा असली तरी गेल्यावेळचा अनुभव लक्षात घेऊन ७० टक्के ग्राहक दुकानात येत आहेत. गतवर्षी अनलॉक होताच ग्राहकांची तुंबळ गर्दी झाली होती. नवीन मोबाईल, टॅबची सर्वाधिक विक्री झाली. राखीव ठेवलेला स्टॉकही कमी पडला होता. कारण ऑनलाईन खरेदीची सुविधा नव्हती.
यंदा कंपन्यांची उत्पादने थेट घरी मागविणे शक्य आहे. तरीही ७० टक्के लोक दुकानांमध्ये येत आहेत. मोबाईल दुरुस्तीसाठी आणणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे.
मध्यमवर्गीय पालक १० ते १५ हजारांच्या किमतीतील मोबाईल घेण्यावर भर देत आहेत. सधन पालक २३ ते ५० हजारांपर्यंतच्या मोबाईलला पसंती देत आहे. ५जी येत असल्याने ग्राहक ४ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी, अँड्रॉइड, स्लीम मोबाईल घेण्यावर भर देत आहेत. काहीजण १० हजार रुपयांपर्यंतचा टॅब खरेदी करीत आहेत.
ग्राफिक्स कार्ड इनबिल्ट रिफर्निंश म्हणजेच काही वर्षे वापरलेले आणि कंपनीमार्फत पुन्हा रिपॅकिंग केलेल्या लॅपटॉपलाही चांगली मागणी आहे, यांची किंमत नव्या लॅपटॉपपेक्षा साधारणत: २५ ते ७५ टक्क्यांनी कमी असते, हे त्यांच्या व्यापक पसंतीचे खरे गमक आहे.
येणाऱ्या काळात एएमडी कंपनी रायझन ३,५,७ अशा प्रकारात प्रोसेसर आणत असून, यात ग्राफिक्स कार्ड इनबिल्ट असणार आहे.
चोखंदळता वाढली
मोबाईलबाबत आता अनेक ग्राहकांना चांगल्या प्रकारे तांत्रिक माहिती झाली आहे. त्यामुळे त्यांच्यातील चोखंदळता वाढली आहे. आगामी काळात मोबाईल क्षेत्रात मोठी तांत्रिक क्रांती अपेक्षित आहे.
- कमलेश निरंकारी,
मोबाईल विक्रेता,
अमळनेर
विद्यार्थ्यांकडे आता प्रगत तंत्रज्ञानाचे मोबाईल आहेत. ऑनलाईन शिक्षण चांगल्यारितीने आत्मसात व्हावे म्हणून पालकही सढळ हाताने मोबाईल खरेदी करीत आहेत.
-ए. एस. करस्कार, उपमुख्याध्यापक जी. एस. हायस्कूल, अमळनेर