अहिरवाडी-पाडळे रस्त्यावरील पूल उभारण्याची मागणी धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:13+5:302021-06-16T04:23:13+5:30

रावेर : तालुक्यातील अहिरवाडी गावालगत पाडळे रस्त्यावर असलेल्या नाल्यातील मोरी उखडून रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे ...

Demand for construction of bridge on Ahirwadi-Padle road is dusty | अहिरवाडी-पाडळे रस्त्यावरील पूल उभारण्याची मागणी धूळखात

अहिरवाडी-पाडळे रस्त्यावरील पूल उभारण्याची मागणी धूळखात

रावेर : तालुक्यातील अहिरवाडी गावालगत पाडळे रस्त्यावर असलेल्या नाल्यातील मोरी उखडून रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे येथे पूल उभारावा, अशी गत १० ते १५ वर्षांपासूनची उभय ग्रामस्थांची मागणी शासनदरबारी धूळखात पडली आहे. परिणामी शेतकरी वर्गासह उभय ग्रामस्थांची कमालीची ससेहोलपट होत आहे.

अहिरवाडी गावालगत पाडळे रस्त्यावर असलेल्या नाल्यातील मोरीची गत १० ते १५ वर्षांपासून गंभीर दुरावस्था झाली आहे. कालांतराने सदरची मोरी उखडून खड्डा निर्माण झाला असून नाल्यातील खड्ड्यात पूर्ण रस्ता खंडित झाला आहे. परिणामतः शेतकऱ्यांना शेती वहिवाटीसाठी ये-जा करतांना, दुचाकी, तीनचाकी चालवताना कसरत करावी लागत असते. चारचाकी वाहनांसह केळीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रक वा ट्रॅक्टरसारख्या अवजड वााहनांची वाहतूक करणे तर खूपच अवघड होत असते. एवढेच नव्हे तर पायी चालणाऱ्यानाही द्रविडी प्राणायाम करावा लागत असल्याने कमाालीचा असंतोष निर्माण झाला आहे.

मोरी नको तर पूलच हवा....

रावेर जि.प. बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयाद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या मोरी बांधकामाला उभय ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. नाल्यात पुलाची मोरी न बांधता आरसीसी काँक्रीट उंच पुलाचे बांधकाम करण्याबाबत उभय ग्रामस्थांची मागणी होती. त्या अनुषंगाने उंच पुलाचे बांधकामाचे अंदाजपत्रक पाठवून चक्क दोन ते तीन वेळा नामंजूर झाल्याने उभय ग्रामस्थांची मागणी लालफितीत धूळखात पडल्याची माहिती सूत्रांकडून समजली. तत्संबंधी, आपद्ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना अनेकदा साकडे घालूनही पुलाची समस्या मार्गी लागत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे

या प्रश्नी लक्ष घालून जि.प. सदस्य नंदा पाटील व पं.स. उपसभापती धनश्री सावळे यांनी जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्याकडे तगादा लावून अहिरवाडी येथील ग्रामस्थांची समस्या धसास लावावी, अशी मागणी होत आहे.

अहिरवाडी-पाडळे रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधकामाचा प्रस्ताव दोन-तीनवेळा पाठवूनही नामंजूर झाला होता. मात्र आता साडेअकरा लाख रुपयांचा अंदाजित खर्च असलेल्या पुलास मंजुरी प्राप्त झाली असून ई-टेंडरच्या प्रक्रियेत सदरचा प्रस्ताव आहे. ई-टेंडर होताच व पाऊस लांबणीवर पडल्यास सदर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

-चंद्रकांत चोपडेकर, उपविभागीय अभियंता, जि.प. बांधकाम विभाग, रावेर.

अहिरवाडी गावालगतच्या नाल्यात पुलाअभावी खंडित झालेला रस्ता. (छाया : किरण चौधरी)

Web Title: Demand for construction of bridge on Ahirwadi-Padle road is dusty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.