डेल्टा प्लसच्या रुग्णांचा सुरत येथून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:34+5:302021-06-25T04:13:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आल्यानंतर त्यातील ४ रुग्ण होमक्वारंटाईन होते. ...

डेल्टा प्लसच्या रुग्णांचा सुरत येथून प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आल्यानंतर त्यातील ४ रुग्ण होमक्वारंटाईन होते. दुसरीकडे यातील काही रुग्णांनी सुरत येथून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने आता लसीकरणावर अधिक भर दिला आहे.
३ मे रोजी एके ठिकाणी कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात ६५ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी सात जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. दिल्ली येथे पाठविण्यात आलेल्या शंभर नमुन्यांमध्ये त्यांचेही नमूने पाठविण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी आरोग्य विभागाला या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याची सूचना मिळाली होती. या रुग्णांचे हायरिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या ४५ जणांची तपासणी केल्यावर सुदैवाने कुणीही बाधित आढळून आले नाही.
या सात रुग्णांपैकी ४ रूग्ण हे गृहविलगीकरणात तर ३ रुग्ण हे एका कोविड सेंटरला दाखल होते. मात्र, त्यांची प्रकृती आता पूर्णपणे सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवाय या ठिकाणी शंभर जणांचे लसीकरण करून घेण्यात आले आहे.
कोरोनाचे विविध प्रकार
कोरोनाचा २०१९ डिसेंबरमध्ये सार्स हा विषाणू आढळला होता. हा विषाणू तेव्हापासून स्व:तामध्ये बदल करून घेत आहे. यात अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा असे विविध प्रकार आहेत. मात्र, अन्य प्रकारांबाबत अभ्यास नाही. दुसरी लाट ही डेल्टा व्हेरिएंटची असल्याने अधिक घातक होती. आता त्यातही या विषाणूने स्वत:मध्ये बदल करून डेल्टा प्लस हा विषाणू जिनोम सिक्वेंसिंगमध्ये आढळून आला आहे. या विषाणूने त्याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये अर्थात त्याच्या बाहेरील आवरणात बदल केला आहे. त्यामुळे तो फुफ्फुसांमध्ये अधिक लवकर प्रवेश करतो, यामुळे गंभीर न्यूमोनिया होऊ शकतो, त्यामुळे नियमित जे नियम आहे ते पाळणे अत्यावश्यक असल्याचे औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ.भाऊराव नाखले यांनी सांगितले.