देव, देश व धर्मासाठी संतांचे जीवन समर्पित- परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 14:09 IST2020-12-15T14:09:47+5:302020-12-15T14:09:47+5:30
ब्रह्मलीन गुरुवर्य जगन्नाथ महाराज जयंतीनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम झाले.

देव, देश व धर्मासाठी संतांचे जीवन समर्पित- परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज
फ जपूर : ब्रह्मलीन गुरुवर्य जगन्नाथ महाराज हे स्वभावाने शांत, मितभाषी व जनकल्याणाची तळमळ सतत त्यांच्या हृदयात होती. संपूर्ण आयुष्य त्यांनी देव, देश आणि धर्म यासाठी समर्पित केले. त्यांनी केलेले सत्कार्य भविष्यातही सुरू राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरू शकते, असे सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. परमपूज्य ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त १३ व १४ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात १३ रोजी मंदिरात महापूजा व १४ रोजी समाधीस्थळी शेतात पादुका पूजन झाले. संस्थानच्या मंदिरात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, खंडेराव देवस्थान मंदिरचे गादीपती परमपूज्य महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज, शास्त्री भक्तीकिशोर दासजी, प.पू. राम मनोहरदासजी, ब्रह्मकुमारी मीरादीदी, शास्त्री कुमुदजी, श्रीकांत रत्नपारखी जळगाव या संतांनी ब्रम्हलीन जगन्नाथ महाराज यांचे प्रतिमापूजन व श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सतपंथ महिला मंडळ फैजपूर, चिनावल तसेच सद्गुरु भजन मंडळ मालेगाव कॅम्प यांनी अखंड हरिनाम व भजन नामसंकीर्तन केले. यावर्षी कोरोना महामारीमुळे शासनाचे नियम बाळगून छोटेखानी व सुटसुटीत नियोजनबद्ध कार्यक्रम करण्यात आला. दिवसभरात ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज व उपस्थित संतांच्या दर्शनासाठी खासदार रक्षा खडसे, जि.प.चे माजी अध्यक्ष नंदकिशोर महाजन, धनंजय शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, मिलिंद वाघुळदे, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, नरेंद्र नारखेडे, नंदकिशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.