प्रवेशद्वार की मृत्यूद्वार, बापरे! दोन डझन अपघात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST2021-08-19T04:20:48+5:302021-08-19T04:20:48+5:30
अमळनेर : धुळे रस्त्यावरील नव्याने बांधण्यात येणारे प्रवेशद्वार हे मृत्यूचे प्रवेशद्वार तर नव्हे ना, असा संतप्त सवाल जनता करीत ...

प्रवेशद्वार की मृत्यूद्वार, बापरे! दोन डझन अपघात!
अमळनेर : धुळे रस्त्यावरील नव्याने बांधण्यात येणारे प्रवेशद्वार हे मृत्यूचे प्रवेशद्वार तर नव्हे ना, असा संतप्त सवाल जनता करीत असून, काल रात्री अपघात झाला आहे. याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदार असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या प्रवेशद्वाराच्या कामामुळे जनता त्रस्त झाली आहे. वळण मार्ग काढण्यात आला आहे. मात्र, वळण दाखविण्यासाठी ठेकेदार तात्पुरते कापडी फलक लावतो, कधी तो फलक काढून ठेवतो, तर कधी तो बाजूलाच पडलेला असतो. त्यामुळे रात्री वळण रस्ता न दिसल्याने वाहन प्रवेशद्वाराला ठोकली जातात किंवा अचानक वळताना उलटी होत आहेत. ठेकेदार नीट दिसेल, असे रेडियम पट्टे लावत नाही, तसेच दोन्हीकडे फलक लावत नाही आणि संबंधित अभियंते कधी कामाकडे फिरकतही नाही. उलट पक्षी ठेकेदाराला संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काल झालेला अपघात हा २४वा झाला असून, उच्च दाबाची वाहिनी असलेला विद्युत खांबही वाकला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, दरवेळी १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांचे काम वाढले आहे.
अनेक महिन्यांपासून काम रखडले आहे. हा प्रमुख राज्य मार्ग असल्याने २४ तास वाहतूक सुरू असते. सततच्या अपघातामुळे जनता प्रचंड संतापली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या सुरक्षेचा विचार करून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
180821\18jal_3_18082021_12.jpg
धुळे रस्त्यावर प्रवेशद्वाराच्या धिम्या कामामुळे झालेला अपघात. रस्ता न दिसल्याने वाहन विद्युत खांबाला धडकले. (छाया : अंबिका फोटो)